भाजपभोवती शेतकरी आंदोलनाचा फास | पुढारी

भाजपभोवती शेतकरी आंदोलनाचा फास

ज्ञानेश्वर बिजले

शेतकरी आंदोलनामुळे पश्चिम उत्तरप्रदेशातील हिंदू-मुस्लीम समाजातील दरी मिटण्याची प्रक्रिया वेगाने घडली. त्याचा फटका थेट भाजपला निवडणुकीत बसणार आहे. शेतकऱ्यांचा कडवा विरोध भाजपच्या दृष्टीने जणू फास ठरला असून, त्यामध्ये भाजपचे अनेक उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात धारातिर्थी पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

पश्चिम उत्तरप्रदेशातील 58 मतदारसंघांत 10 फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे. तेथे भाजपने गेल्या वेळी जिंकलेल्या जागांपैकी निम्म्या जागा राखण्यात यश मिळविले, तरच त्यांना उत्तरप्रदेशातील सत्ता राखण्याची संधी मिळेल. तेथे शेतकरी आंदोलनामुळे राष्ट्रीय लोकदलाला नवसंजिवनी प्राप्त झाली आहे. त्यांच्या पाठिशी समाजवादी पक्ष भक्कमपणे उभा राहिल्याने, निवडणुकीच्या पहिली दोन्ही टप्प्याचे चित्र बदलल्याचे जाणवते.

गेल्या निवडणुकीचे निकाल

दिल्ली, हरियानालगतच्या 11 जिल्ह्यातील 58 मतदारसंघांत पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे. तेथे भाजपचे 53 आमदार, सप आणि बसपचे प्रत्येकी दोन, तर रालोदचा एक आमदार 2017 मध्ये निवडून आले. रालोदचा आमदार भाजपमध्ये गेल्याने, रालोदचा सध्या एकही खासदार अथवा आमदार नाही. मुझफ्फरनगरमधील 2013 मध्ये झालेल्या दंगलीचा फायदा घेत भाजपने ध्रुवीकरण केले. त्याचा फायदा त्यांना तीन निवडणुकांत झाला. येथील जमीनदार वर्ग असलेला जाट समाज भाजपमागे ठामपणे उभा राहिला. जाट विरुद्ध मुस्लीम, विरोधकांची मतविभागणी याआधारे भाजपने 53 जागा जिंकल्या. हा चमत्कार पुन्हा घडणे शक्य नाही.

शेतकरी आंदोलनाचा परिणाम

तीन कृषी कायद्यामुळे पंजाब, हरियाणात शेतकरी आंदोलन सुरू झाले. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांच्याकडे प्रारंभी भाजपचे हस्तक म्हणून पाहिले गेले होते. मात्र, दिल्लीबाहेर गाझीपूर सिमेवर राज्य सरकार मध्यरात्री कारवाई करीत असताना, टिकैत यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. अन चित्र पालटले. स्वाभिमानी जाट त्यांच्यामागे ठामपणे उभे राहिले.

रालोदचे अध्यक्ष जयंत चौधरी यांनी गावोगावी सभा घेत शेतकऱ्यांचे संघटन केले. शेतीचा प्रश्न असल्याने, मुस्लीम शेतकरीही त्यांच्या पाठिशी उभे राहिले. धर्मजातीच्या भिंती मोडत शेतकऱ्यांचे आंदोलन जोर पकडू लागले. जाटांच्या खाप पंचायती पाठिशी आल्याने, भाजपला जोरदार विरोध झाला. शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही कृषी कायदे मागे घेतले. मात्र, शेतकऱ्यांच्या अन्य मागण्यांवर अद्यापही निर्णय झालेला नाही.

कायदे मागे घेतल्याने, शेतकऱ्यांचा राग काही प्रमाणात कमी झाला असला, तरी त्याची धग अजूनही दिसत आहे. त्यातच शेतकरी संघटनांनी नुकतीच थेट भाजपविरोधी भुमिका जाहीर केली. कारण भाजप जिंकले, तरी शेतकरी आंदोलनावर निश्चित परिणाम होईल. त्यामुळे, शेतकरी नेतेही भाजपच्या विरोधात उभे ठाकले. त्याचा निश्चित परिणाम पहिल्या दोन-तीन टप्प्यातील पश्चिम उत्तरप्रदेशातील मतदानावर होईल.

ध्रुवीकरणाची चाल

उत्तरप्रदेशात गेल्या तीन निवडणुकीचे सुकाणू हाती ठेवलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुझफ्फरपूर दंगल, कैरानाही हिंदू कुटुंबांचे पलायन, सपचे नेते अखिलेश यादव यांचे महंमद अली जिना व पाकिस्तान यांच्याबाबतचे वक्तव्य यांचा वापर प्रचारात केला. मात्र, मतदारांचा प्रतिसाद मिळाला नाही. जाट नेत्यांची बैठक घेत त्यांनी जयंत चौधरी यांना साद घातली. त्यामुळे, किमान सपच्या मुस्लीम उमेदवारांना जाट मते मिळणार नाहीत, अशी चाल रचली. मात्र, त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही.

जयंत चौधरींना महत्त्व

दिवंगत पंतप्रधान चरणसिंग यांचे नातू जयंत चौधरी यांना पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या महत्त्व प्राप्त झाले आहे. ते चुकीच्या घरी गेले आहेत, असे म्हणत अमित शहा यांनी जयंत चौधरी यांना साद घातली. मात्र, त्यामुळे रालोद व सप आघाडी भक्कम झाली. अखिलेश यादव व जयंत चौधरी एकत्र सभा व प्रचारफेरी करीत पहिल्या टप्प्यातील सर्व जिल्हे पिंजून काढले. भाजपमध्ये जाणार नसल्याचे जयंत चौधरी यांनी जाहीर केले. त्यामुळे भाजपने त्यांचेच निवडणुकीनंतरचे एक गणित फिसकटून टाकले.

आघाडीची ताकद

पहिल्या टप्प्यातील 58 जागांपैकी रालोद 29 जागी, तर सप 28 जागी निवडणूक लढवित आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेेते शरद पवार यांच्या सुचनेवरून एक जागा राष्ट्रवादीचा दिल्याचे यादव यांनी सांगितले. दोन्ही पक्षांनी उमेदवार निवडताना मुस्लीम व अन्य समाजाच्या कार्यकर्त्यांनाही संधी दिली. जाट व मुस्लीम एकगठ्ठा मागे राहिले, तर आघाडीच्या जागा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.

बसपची खेळी

बसपचे गेल्या निवडणुकीत दोन आमदार व दुसऱ्या क्रमांकावर 29 उमेदवार होते. त्यांनी मुस्लीम उमेदवार मोठ्या संख्येने उभे केले आहेत. मतविभागणीचा फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे. बसपमागे जाटव समाज एकवटला आहे. सध्या आघाडीला विरोध करण्यासाठी जाटव भाजपच्या मागे उभे राहात असल्याची चर्चा आहे. तरीदेखील काही मतदारसंघांत बसपच्या ताकदवान उमेदवारांमुळे तिरंगी लढत रंगली आहे.

काँग्रेसची गुढ माघार

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी गेल्या तीन महिन्यात प्रचाराला वेगळी उंची देत महिला, युवा व दलित मतदारांवर लक्ष केंद्रीत केले होते. मात्र, ऐन रणधुमाळीत त्या प्रचाराच्या पटलावरून गायब झाल्या. काही ठिकाणी त्यांनी रोड शो केले. अखिलेश यादव, जयंत चौधरी याचा विजय रथ हा गांधी यांच्या पदयात्रेला एका ठिकाणी समोरासमोर आला. त्यांनी एकमेकांना हात करीत शुभेच्छा दिला. काँग्रेसने महिला, युवा यांच्यासाठी स्वतंत्र जाहीरनामा काढताना, आज शेतकऱ्यांना दहा दिवसांत कर्जमाफी देण्याचे जाहीर केले. मात्र, प्रियंका गांधी सध्या उत्तरप्रदेशात फारशा सक्रीय नाहीत. त्यांनी आघाडीला चाल दिल्याचे जाणवते. त्यातच निवडणुकीनंतर आघाडीला पाठिंबा देण्याचेही सुतोवाच केले आहे.

दुरंगी लढतीत भाजपचे स्थान

गेल्या सात वर्षांत भाजपने जाट समाजात चांगले स्थान निर्माण केले. त्यांच्यासह अन्य ओबीसी नेते भाजपमध्ये असल्याने, ते स्पर्धेत आहेत. शेतकऱ्यांची नाराजी असली, तरी सर्वत्र त्यांची मते विरोधात जाणार नाहीत, याची काळजी ते घेत आहेत. त्यामुळे भाजप विरुद्ध आघाडी अशी थेट लढत अनेक मतदारसंघात झाली, तरी भाजपचे कमीत कमी नुकसान होईल, याकडे त्यांचे नेते लक्ष देत आहेत.

पहिल्या टप्प्याच्या परिणाम

दुसऱ्या टप्प्यात मुस्लीमबहुल जिल्हे आहेत. तेथे सप आणि बसपचे चांगले वजन आहे. पहिल्या टप्प्यात भाजप मागे पडत असल्याचे पर्सेप्शन (समज) जनमानसात तयार झाल्याचे त्याचे परिणाम पुढील सर्व निवडणुकीवर होईल. तरीदेखील भाजप गेल्या वेळच्या तुलनेत किमान निम्म्या जागा राखण्यासाठी प्रयत्नांची शर्त करील. शेतकरी नेते किती विरोध करतात आणि त्यांचा परिणाम ग्रामीण भागात किती होतो, यांचे प्रतिबिंब निवडणूक निकालात दिसणार आहे.

Back to top button