मोदींनी १५ लाख खात्यात पाठवले म्हणून घर बांधून रिकामा झाला आणि ४ महिन्यांनी उलघडा होताच..

मोदींनी १५ लाख खात्यात पाठवले म्हणून घर बांधून रिकामा झाला आणि ४ महिन्यांनी उलघडा होताच..

पैठण,  पुढारी वृत्तसेवा :  औरंगाबाद जिल्हा परिषद पंचायत विभागाच्या भोंगळ कारभाराचा नमुना चव्हाट्यावर आला आहे. बँक अकाऊंटच्या केवळ एका नंबरच्या चुकीने पैठण तालुक्यातील पिंपळवाडी येथील ग्रामपंचायतीचे १५ लाख रुपयाचा निधी दावरवाडी येथील एका शेतकऱ्याच्या बँक ऑफ बडौदाच्या खात्यात जमा झाले आहेत.

सदरील शेतकऱ्यांनी हे पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जमा केल्याचे समजून या पैशातून सुसज्ज घर बांधकाम केले. मात्र बँकेने वसूली काढल्यानंतर हा घोटाळा उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे. पंतप्रधान मोदींनी २०१४ च्या निवडणुकांमध्ये दिलेले आश्वासन पाळत हे पैसे त्याच्या जनधन खात्यात टाकले. असे समजून यातील ९ लाख काढत त्याने त्याचे घरही बांधले.

ग्रामपंचायतीच्या तब्बल ४ महिन्यांनंतर ही चूक लक्षात आली असून आता पिंपळवाडी ग्रामपंचायतीने पैसे परत करण्यासाठी शेतकऱ्याकडे तगादा लावला आहे. पैठण तालुक्यातील दावरवाडी येथील शेतकरी ज्ञानेश्वर जनार्धन औटे यांच्या बँक ऑफ बडाेदाच्या खात्यावर १७ ऑगस्ट २०२१ ला १५ लाख ३४ हजार ६२४ रुपए जमा झाले. खात्यात इतके पैसे कसे आले यावर गावात चर्चा सुरु झाल्यानंतर अनेकांनी ज्ञानेश्वर यांचे अभिनंदन करत, हे पैसे दिलेल्या आश्वासनानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच पाठवले असल्याचे त्यांना सांगितले.

खरंच असं घडले असेल हा विचार करत ज्ञानेश्वर यांनी दावरवाडी येथे घर बांधायला घेतले व जमा रकमेतील ९ लाख खर्च केले. मात्र सदरील निधी १५ व्या वित्त आयोगाचे ग्रामपंचायतीला जिल्हा परिषदेकडून मिळणारे हे पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झाल्याची चूक ४ महिन्यांनंतर ग्रामपंचायतीला लक्षात आली. आता ज्ञानेश्वर यांना ग्रामपंचायतीने पैसे परत करण्याचे पत्र पाठवले असून यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

पैसे आपल्याला मिळाल्याचे वाटल्यानेच आपण ते खर्च केले, आता उरलेले ६ लाख व खर्च केलेली रक्कम आपण बँकेला व ग्रामपंचायतीला हप्त्या-हप्त्याने परत करू असे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. हा विषय सध्या पैठणमध्ये चर्चेचा ठरला आहे.

बँकेचे पत्र आल्यावर खरा प्रकार कळाला

बँक ऑफ बडाेदाचे पत्र आल्यावर झालेला प्रकार समाेर आला. तोपर्यंत हे पैसे पंतप्रधानांनीच आपल्या जनधन खात्यावर टाकले असे वाटत होते. काहीच पैसे नसल्याने मी ही रक्कम लगेच परत नाही करु शकणार. ग्रामपंचायत आणि बँकेने सवलत दिली तर हप्त्याने ही रक्कम मी भरण्यास तयार आहे, असे या शेतरक-यानी सांगितले.

शेतकऱ्याच्या खात्यावर एवढी मोठी रक्कम आली, ही बाब शेतकऱ्यांनी बँक, किंवा पोलिसांना सांगणे आवश्यक होते, ही रक्कम दिनांक १७ ऑगस्‍ट २०२१ रोजी शेतकऱ्याच्या खात्यावर चुकून जमा करण्यात आली. तसेच ही.रक्कम परत करावी अन्यथा गुन्हा दाखल करु. असे ग्रामसेवक या शेतक-याला इशारा दिला आहे. तसेच औटे यांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याच्या दीड महिन्यांनंतर मी येथे रुजू झालो आहे. असे ग्रामसेवक  म्‍हणाले.

बँक आँफ बडोदा शाखा अधिकारी आशू आटकळे म्हणाले की, बॅंकेला कोणाचेही खाते बघता येत नाही, ग्रामपंचायतीने सांगितल्यानंतर ही बाब आमच्या लक्षात आली, तेव्हा आम्ही सबंधित शेतकऱ्यांना पत्र काढले असुन शेतकऱ्यांनी पैसे जमा करावे. यासाठी कारवाई करण्याचा अधिकार आम्हाला नाही, प्रशासन योग्य कारवाई करेल. असे शाखा अधिकारी म्‍हणाले.

या प्रकरणात जिल्हा परिषद विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी भोकरे यांनी चौकशी करून निर्णय घेणार आहे अशी माहिती पंचायत समितीचे गट विकास अधिकारी ओमप्रकाश रामावत यांनी दिली तसेच पिंपळवाडी ग्रामपंचायत ने चुकीचा खाते क्रमांक पाठवला आहे त्यामुळे जबाबदारी निश्चित करून कारवाई निश्चित होणार जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी भोकरे यांनी सांगितले आहे.

सरपंच मंदा दहीहंडे पंचायत समिती जिल्हा परिषद चौथ्या हप्त्यासाठी वेळोवेळी चौकशी केली . मात्र प्रशासनाने जमा होईल असे उत्तर दिले . चार ते पाच महिने निघून गेल्यावर प्रशासनाच्या लक्षात आले ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा न होता रक्कम एका व्यक्तीच्या खात्यावर जमा झालेले आहे . त्यामुळे सदरील रक्कम ग्रामपंचायत खात्यात जमा करावी यासाठी प्रशासनाला आम्ही रितसर पत्र याअगोदर दिलेले आहे . तसेच यामुळे आमच्या गावचा विकास खुंटला आहे . तरी शासनाने आमचे पैसे तात्काळ ग्रामपंचायतला वर्ग करावे .

जिल्हा परिषद सारख्या विभागातून झालेला हा प्रकार अत्यंत चुकीचा असून याबाबत जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडून माहिती घेण्यात येऊन याबाबत योग्य तो निर्णय घेतल्या जाईल अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे.

हे ही वाचलं का  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news