चढ्या दराने केली जात होती खत विक्री ; अधिकार्‍यांनी केली ग्राहक बनून शहानिशा, विक्रेत्यांचे परवाने निलंबित | पुढारी

चढ्या दराने केली जात होती खत विक्री ; अधिकार्‍यांनी केली ग्राहक बनून शहानिशा, विक्रेत्यांचे परवाने निलंबित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : यंदाच्या रब्बी हंगामात शेतकर्‍यांकडून खतांची मागणी वाढल्यामुळे अनेक कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी चढ्या दराने खते विक्री केल्याच्या तक्रारी शेतकर्‍यांच्या येत आहेत. त्यामुळे कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण पथकाच्या अधिकार्‍यांनी ग्राहक बनून शहानिशा केली असता, कच्ची बिले देणे, चढ्या दराने विक्री करणे आदी प्रकार आढळून आले. यामुळे गेल्या दोन महिन्यांमध्ये सात खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आल्याची माहिती गुणवत्ता नियंत्रण अधिकारी अभिजित जमधडे यांनी दिली.

यावर्षी चांगला पाऊस झाल्याने रब्बीचे क्षेत्र वाढले असून, शेतकर्‍यांकडून रासायनिक खतांना चांगली मागणी आहे. मागणी वाढल्याने अनेक खते विक्रेत्यांनी कृत्रिम टंचाई दाखवून शेतकर्‍यांना चढ्या दराने विक्री करणे, कच्ची बिले देणे, लिंकिंग करणे आदी प्रकार सुरू केले.

याबाबत शेतकर्‍यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्यानंतर, गुणवत्ता नियंत्रण पथकाच्या अधिकार्‍यांनी बनावट ग्राहक बनून अनेक दुकानांमध्ये पाहणी केली. या वेळी त्यांनाही काही दुकानांमध्ये कच्ची पावती देणे, खते चढ्या दराने विकणे आदी प्रकार होत असल्याचे आढळले. अशा गैरप्रकारांचा अवलंब करणार्‍या जिल्ह्यातील सात विक्रेत्यांवर कारवाई प्रस्तावित केली होती. त्यात प्रामुख्याने बागलाण तालुक्यातील बुंधाटे येथील समर्थ कृषी भांडार, येवला येथील साईराज अ‍ॅग्रो एजन्सी, लासलगाव येथील कृषिमित्र अ‍ॅग्रो, भंडारी ब—दर्स, पालखेड येथील श्री स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र, विजय अ‍ॅग्रोटेक एजन्सी व मेधने कृषी सेवा केंद्र या सात खत विक्रेत्यांची जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात सुनावणी झाल्यानंतर त्यात या खते विक्रेत्यांनी नियमांचा भंग केल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे त्यांचे परवाने सात दिवस ते महिनाभरासाठी निलंबित करण्यात आले आहेत. मोहीम अधिकारी अभिजित जमधडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

हेही वाचा :

व्हिडिओ पहा : मी नथुरामच्या व्यक्तिरेखेचं समर्थन करत नाही

Back to top button