देशात एका दिवसात ३.३३ लाख कोरोनाबाधितांची भर; ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या तब्बल २२ लाखांवर | पुढारी

देशात एका दिवसात ३.३३ लाख कोरोनाबाधितांची भर; ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या तब्बल २२ लाखांवर

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

देशात कोरोना बाधितांचा वाढता आकडा सुरुच आहे. मागील २४ तासात देशात ३ लाख ३३ हजार बाधितांची भर पडली आहे. देशातील एकूण बाधितांची संख्या २२ लाखांवर पोहोचली आहे. यासह, आतापर्यंत देशात कोविड बाधितांची एकूण संख्या ३ कोटी ९२ लाख ३७ हजार २६४ झाली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशभरात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या २१ लाख ८७ हजार २०५ झाली आहे. एकूण संसर्ग दर ५.५७ टक्के झाला आहे. सध्या देशातील रिकव्हरी दर ९३. १८ टक्क्यांवर आला आहे. मात्र, गेल्या २४ तासांत देशभरात एकूण २ लाख ५९ हजार १६८ रुग्ण बरे झाले आहेत, जे नवीन रुग्णांच्या संख्येपेक्षा कमी आहे. देशभरात आतापर्यंत एकूण ३ कोटी ६५ लाख ६० हजार ६५० लोकांनी या साथीवर मात केली आहे.

देशातील दररोजचा पॉझिटिव्हीटी रेट आता १७.७८ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. साप्ताहिक रेटही वाढून आता तो १६.८७ टक्क्यांवर पोहोचला आहे. आतापर्यंत (२२ जानेवारीपर्यंत) देशात एकूण ७१.५५ कोटी नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. गेल्या २४ तासात १८ लाख ७५ हजार ५३३ नमुने तपासण्यात आले आहेत.

कोरोना संसर्ग झालेल्यांना तीन महिन्यांपर्यंत लस नाही

कोरोना संसर्ग झालेल्या नागरिकांना आता बरे झाल्यानंतर तीन महिन्यांनी कोरोना लस देण्यात येईल. यामध्ये बूस्टर डोसचाही समावेश असेल, असे निर्देश केंद्राकडून देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य विभागाच्या अप्पर सचिव विकास शील यांनी राज्यांना पत्र पाठवून यासंबंधीच्या सूचना दिल्या आहेत.

15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे कोरोना लसीकरण सुरू झाले आहे. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्सना खबरदारी म्हणून बूस्टर डोस देण्यात येत आहे. 60 वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांनाही लसीकरणाचे 9 महिने पूर्ण झाल्यानंतर बूस्टर डोस देण्यात येत आहे. परंतु, राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाच्या शिफारशीनुसार आता कोरोना झालेल्या व्यक्‍तीचे लसीकरण किंवा बूस्टर डोस पुढे ढकलण्यात येणार आहे.

दरम्यान, 12 ते 14 वयोगटातील किशोरवयीन मुलांचे लसीकरण फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू होईल, अशी माहिती राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाच्या कोरोना कार्यगटाचे अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा यांनी दिली. 15 ते 17 वयोगटातील सर्व 7.4 कोटी किशोरवयीन मुलांना जानेवारीच्या अखेरीस पहिला डोस देण्याचे उद्दिष्ट निश्‍चित केले आहे. फेब्रुवारीअखेरीस दुसरा डोस पूर्ण होईल. त्यानंतर 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांना फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा मार्चच्या सुरुवातीपासून लसीकरण सुरू होईल, असे संकेत अरोरा यांनी दिले.

हे ही वाचलं का ?

Back to top button