बायको माहेरी गेल्याचा राग आल्याने, मद्यपी पती चढला साडेतीनशे फुट उंच टॉवरवर | पुढारी

बायको माहेरी गेल्याचा राग आल्याने, मद्यपी पती चढला साडेतीनशे फुट उंच टॉवरवर

निफाड ; पुढारी वृत्तसेवा ; दारू चढली की लोक चंद्रावर जातात असे म्हटले जाते परंतु निफाड येथे मात्र एक मद्यधुंद मजनू आकाशातल्या चंद्रा ऐवजी थेट दूरसंचार च्या तीनशे पन्नास फूट उंचीच्या मनोऱ्यावर चढून बसला. बायको माहेरी गेल्याचा राग आल्याने आपण मनोऱ्यावर चढलो असे त्याचे म्हणणे होते.

शनिवार दिनांक 22 रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास निफाड नासिक रस्त्यावरील जळगाव फाटा येथे असलेल्या भारत संचार निगम लिमिटेड च्या साडे तीनशे फूट उंच मनोऱ्यावर जवळच्याच झोपडपट्टीत राहणाऱ्या दिलीप मोरे या मद्यधुंद इसमाने सुरक्षारक्षकांची नजर चुकवून चढण्यास सुरुवात केली. कुणाच्याही लक्षात येण्यापूर्वीच तो दारूच्या नशेत भराभर भराभर मनोऱ्याचा शिखरावर जाऊन पोहोचला. त्याचा हा पराक्रम पाहून आजूबाजूचे नागरिक धास्तावून गेले आणि त्याला खाली उतरवण्यासाठी सर्वांची एकच धावपळ उडाली. दूरसंचार च्या कर्मचाऱ्यांनी त्याला खाली उतरविण्या साठी धडपड सुरू केली परंतु मनोर्‍याची उंची खूप असल्याने सर्वांचा नाईलाज झाला. या घटनेचे खबर संबंधितांनी निफाड पोलिसांना दिली तसेच त्याच्या बचावासाठी अग्निशामक दलाला देखील पाचारण करण्यात आले. परंतु हे महाशय दारूच्या नशेत असल्याने कुणालाही जुमानायला तयार नव्हते.

दूरसंचार च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांबरोबरच पोलीस यंत्रणा आणि अग्निशामक दलाच्या जवानांची देखील या प्रकारामुळे चांगलीच तारांबळ उडाली. तब्बल चार तास पर्यंत या मद्यधुंद इसमाला मनोऱ्यावरून खाली उतरवण्यासाठी प्रयास सुरू होते. दुपारी बारा वाजता सुरू झालेला हा गोंधळ सुमारे चार तास सुरू होता. शेवटी चार तासानंतर त्याची नशा उतरल्यावर महाराज खाली आले आणि सर्वांनी सुटकेचा एकच निश्वास सोडला.

हेही वाचा:

Back to top button