धुळे : ‘रात्री वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे’ बनावट एसएमएसचा सुळसुळाट ; प्रतिसाद न देण्याचे महावितरणचे आवाहन | पुढारी

धुळे : 'रात्री वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे' बनावट एसएमएसचा सुळसुळाट ; प्रतिसाद न देण्याचे महावितरणचे आवाहन

धुळे : पुढारी वृत्तसेवा : मागील महिन्याचे वीजबिल अपडेट नसल्याच्या कारणावरून आज रात्री वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. त्याकरिता ताबडतोब सोबत दिलेल्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा’, असे बनावट ‘एसएमएस’ वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून नागरिकांना पाठविण्यात येत आहेत. अशा प्रकारचे कोणतेही ‘एसएमएस’  महावितरणकडून पाठविण्यात येत नाही. त्यामुळे या मेसेजला प्रतिसाद वा उत्तर देऊ नये असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

वेगवेगळ्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून पाठविण्यात येणाऱ्या परंतु महावितरणशी संबंधित ‘एसएमएस’ किंवा व्हॉट्स अॅप मेसेज किंवा कॉलला नागरिकांनी प्रतिसाद देऊ नये. बिल भरण्यासाठी वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून एखादी लिंक पाठविण्यात आली असेल तर संपूर्णपणे दुर्लक्ष करावे. अन्यथा यामधून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे. महावितरणकडून केवळ मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या वीजग्राहकांनाच सिस्टीमद्वारे ‘एसएमएस’ पाठविण्यात येतात आणि त्याचा सेंडर आयडी हा ‘एमएसईडीसीएल’ (उदा. VM-MSEDCL, VK-MSEDCL) असा आहे. तसेच या अधिकृत मेसेजमधून कोणालाही कोणत्याही अधिकाऱ्याच्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे कळविले जात नाही.

महावितरणकडून केवळ ‘एसएमएस’द्वारे पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्ती, तांत्रिक किंवा अन्य कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत होण्यास लागणारा संभाव्य कालावधी तसेच दरमहा वीजबिलांची रक्कम, स्वतःहून मीटर रिडींग पाठविण्याचे ग्राहकांना आवाहन, मीटर रिडींग घेतल्याची तारीख व वापर केलेली एकूण युनिट संख्या, वीजबिलाची रक्कम, देय दिनांक, वीजपुरवठा खंडित करण्याची नोटीस आदींची माहिती पाठविण्यात येते. वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून नागरिकांना पाठविण्यात येणारे मेसेज हे बनावट आहे व त्यातून आर्थिक फसगत होऊ शकते असे महावितरणने स्पष्ट केले आहे.

त्यामुळे वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून प्राप्त झालेल्या महावितरणशी संबंधित ‘एसएमएस’ किंवा अन्य मेसेज, कॉल तसेच पेमेंटच्या लिंकला नागरिकांनी प्रतिसाद किंवा कोणतेही उत्तर देऊ नये. मेसेजमध्ये नमूद केलेल्या कोणत्याही वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू नये. काही शंका व तक्रारी असल्यास वीजग्राहकांनी चोवीस तास सुरु असलेल्या १९१२, १८००१०२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांक किंवा नजीकच्या कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा :

Back to top button