भुसावळ तालुक्यातील एका कंपनीत स्फोट; दोन कामगारांचा मृत्यू | पुढारी

भुसावळ तालुक्यातील एका कंपनीत स्फोट; दोन कामगारांचा मृत्यू

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

भुसावळ तालुक्यातील सुनसगाव रस्त्यावर असलेल्या एका कंपनीत वेल्डींग करतांना झालेल्या स्फोटात दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. घटनेची माहिती मिळताच भुसावळ तालुक्याचे व नशिराबाद पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिया कॉपर मास्टर अलायन्स कंपनी ही भुसावळ तालुक्यातील सुनसगाव रस्त्यावर आहे. शुक्रवारी २१ जानेवारी रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास कंपनीतील भरलेल्या ऑईल टाकीला दोन कर्मचारी वेल्डिंग करण्याचे काम करत होते. वेल्डिंग करतांना अचानक शार्टसर्किमुळे मोठा स्फोट झाला.

या दुर्घटनेत काशिनाथ सुरवाडे रा. खेडी रोड जळगाव आणि खेमसिंग पटेल रा. बेमतेरा. छत्तीसगड या दोन कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. झालेल्या घटनेत स्फोटात मोठा आवाज झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. परिसरातील नागरीकांना धाव घेतली होती. या घटनेची माहिती मिळताच भुसावळ पोलीस ठाण्याचे सपोनि प्रकाश वानखेडे यांच्यासह पोलीस पथकाने धाव घेतली आहे. मयत झालेले कर्मचाऱ्यांची अधिक माहिती घेतली जात आहे.

दरम्यान, आगीची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी कंपनीकडे धाव घेऊन आग विझवण्यासाठी मदत सुरू केली. या आगीत कंपनीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. तर या आगीत अजून काही कर्मचार्‍यांना देखील इजा झाल्याची माहिती असून त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले आहेत.

Back to top button