पुणे : पुढारी वृत्तसेवा
पुर्ववैमनस्यातून एका अल्पवयीन मुलावर गोळीबार केल्याची घटना गुरूवारी रात्री साडे नऊच्या सुमारास शिवणे परिसरात घडली. मित्राच्या वाढदिवसाला जात असताना पाठलाग करून हा गोळीबार करण्यात आल्याची माहिती आहे. याप्रकरणी, उत्तमनगर पोलिस ठाण्यात सहा जणांच्या विरुद्ध खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टोळक्याने स्थानिक परिसरातील नागरिकांना देखील दमबाजी करत विटा फेकून मारल्या आहेत. गोळीबार करणारी मुले देखील अल्पवयीन असल्याची प्राथमिक माहिती आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलगा व आरोपींची मागील काही दिवसापुर्वी भांडणे झाली होती. फिर्यादी हा त्याच्या मित्रासोबत दुचाकीवरून लक्ष्मीपुरा सोसायटीत शिवणे येथे एका मित्राच्या वाढदिवसाला निघाला होता. त्यावेळी रामनगर वारजे येथे राहणाऱ्या आरोपींनी त्यांचा पाठलाग करून त्याला रस्त्यात गाठले. त्यानंतर एकाने गावठी कट्ट्याने फिर्यादीच्या डोक्यात मारहाण करून त्याचावर गोळीबार केला. सुदैवाने गोळी हुकल्यामुळे फिर्यादी मुलगा थोडक्यात बचावला. हा प्रकार पाहून स्थानिक लोकांनी तेथे धाव घेतली. त्यावेळी आरोपींनी त्यांना दमबाजी करून विटा फेकून मारल्या.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी आरोपींनी तेथून पळ काढला होता. हा प्रकार घडला त्यावेळी स्वतः उत्तमनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रात्रगस्तीवर होते. रात्री उशीरापर्यंत याची माहिती मुख्यनियंत्रण कक्षाला दिली गेली नव्हती. हा प्रकार समजतात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
पुणे आणि परिसरात अवैध आणि घातक हत्यारांचा वाढता वापर चिंतेचा विषय बनला आहे. त्यातच या घटनेमुळे पंधरा-सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलांना देखील गावठी कट्टे सहज उपलब्ध होऊ लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे पोलिसांनी या घटनेकडे अधीक गांभीर्याने पहावे असे नागरिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, मागील काही दिवसापासून उत्तमनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी डोके वर काढू पाहते आहे. परिसरातील अवैध धंदे, नव्याने उदयाला येऊ पाहणाऱ्या गुन्हेगारी टोळ्या, टोळ्यातील वर्चस्ववाद अशी विविध कारणे त्याच्या पाठीमागे असल्याचे बोलले जाते. मागली वर्षी देखील दोन गटाच्या वादातून उत्तमनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गोळीबार झाल्याची घटना घडली होती. तर गेल्या आठवड्यात सोसाटीतील वाहन जळीतकांड देखील याच पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडले आहे. त्यामुळे स्थानिक परिसरात पोलिसांचा वचक आहे की नाही असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.