चक्क कुत्र्याच्या नावाचे आधारकार्ड! | पुढारी

चक्क कुत्र्याच्या नावाचे आधारकार्ड!

नवी दिल्ली : आपल्या देशात आधारकार्ड हा महत्त्वाचा दस्तावेज बनला आहे. आधारकार्डद्वारे लोकांची ओळख पटते. भारतातील प्रत्येक नागरिकाकडे आधारकार्ड असणे बंधनकारक आहे, पण तुम्ही कधी कुत्र्याचे आधार कार्ड पाहिलेय का? आता भटक्या कुत्र्यांची ओळखही आधारकार्डद्वारे पटणार आहे. दिल्ली विमानतळावर 27 एप्रिल रोजी एकूण 100 कुत्र्यांना क्यूआर-आधारित ‘आधारकार्ड’ देण्यात आले आहे. दिल्ली टी 1 विमानतळ, इंडिया गेट व प्रसिद्ध एनजीओ ‘पॉफ्रेंड डॉट इन’ सह विविध ठिकाणी असणार्‍या कुत्र्यांना हे आधारकार्ड देण्यात आले आहे. प्राण्यांचे रक्षण आणि संरक्षण करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.

कुत्रे इकडे-तिकडे भटकतात, हरवतात यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. या उपक्रमाचे महत्त्व लक्षात घेऊन, मानवी राय यांनी आनंद व्यक्त करताना सांगितले, “आज मला हे सांगताना आनंद होत आहे की, हे क्यूआर-आधारित टॅग आमच्या प्रेमळ मित्रांसाठी, विशेषत: संकटाच्या वेळी त्यांना जीवनदायी ठरतील.” कुत्र्यांसाठी तयार करण्यात आलेले क्यूआर आधारकार्ड कसे काम करते? तर यामध्ये एक क्यूआर कोड स्कॅनर बसविण्यात आला आहे; ज्यामध्ये त्या कुत्र्याशी संबंधित सर्व प्रकारची माहिती नमूद केलेली असेल.

त्यामुळे तुम्ही तो क्यूआर कोड स्कॅन करताच, तुम्हाला त्या कुत्र्याचे नाव काय, त्याचे लसीकरण करण्यात आलेय की नाही आणि असल्यास, केव्हा गेलेय ते कळेल. त्याशिवाय त्या स्कॅनरमध्ये नसबंदीसह वैद्यकीय तपशीलही आहेत. हा अनोखा उपक्रम ‘पॉफ्रेंड डॉट इन’ नावाच्या संस्थेने सुरू केल्याचे सांगितले जात आहे. त्यांनीच कुत्र्यांची ओळखपत्रे बनवली आहेत. संबंधित कुत्रा हरवल्यास त्याला शोधण्यासाठी क्यूआर कोडची मदत होईल.

Back to top button