20 हजार वर्षांपूर्वी पर्शियन पठारावर आदिमानवाचे अस्तित्व | पुढारी

20 हजार वर्षांपूर्वी पर्शियन पठारावर आदिमानवाचे अस्तित्व

लंडन : ‘होमो सेपियन्स’ ना आधुनिक मानवाचे पूर्वज मानले जाते. हे मानव ज्यावेळी आफ्रिका खंड सोडून बाहेर पडले, त्यावेळेच्या त्यांच्या पाऊल खुणांचा मागोवा सातत्याने घेतला जात असतो. 20 हजार वर्षांपूर्वी हे मानव युरेशियामध्ये वास्तव्य करू लागले. आता एका नव्या संशोधनातून दिसून आले आहे की, सुरुवातीच्या रहस्यमय कालखंडात त्यांचे पर्शियन पठारावरही वास्तव्य झाले होते.

सुरुवातीच्या होमो सेपियन्स मानवांच्या स्थलांतराचे जीवाश्मभूत पुरावे संशोधकांना सापडले आहेत. 2 लाख 10 हजार वर्षांपूर्वी होमो सेपियन्सनी आफ्रिका सोडली. 70 हजार वर्षांपूर्वी तेथून मोठ्या प्रमाणात अन्यत्र स्थलांतर झाल्याचे जनुकीय पुरावे आहेत. हे स्थलांतर त्यावेळी यशस्वी ठरले होते. सध्याच्या काळातील गैरआफ्रिकन मानवांमध्ये त्याच्या जनुकीय खुणा पाहायला मिळतात. मात्र, 60 हजार ते 45 हजार वर्षांपूर्वीच्या कालखंडातील होमो सेपियन्स जीवाश्मांचा युरेशियात शोध लागत नव्हता.

या काळात आधुनिक मानव कुठे गेले याचे संशोधकांना कुतूहल होते. आता क्लायमेट मॉडेल्स आणि जेनेटिक डाटाचा वापर करून नवे संशोधन करण्यात आले. त्यामधून दिसून आले की, पर्शियन पठार हे त्यांच्यासाठी सर्वात अनुकूल असे राहण्याचे ठिकाण होते. याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘नेचर कम्युनिकेशन्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सध्याच्या इराण देशाचा हा भूभाग आहे. तसेच त्यामध्ये पर्शियन आखात आणि मेसोपोटामियाचाही समावेश होतो. 70 हजार ते 45 हजार वर्षांपूर्वीच्या काळात सध्याच्या सर्व गैरआफ्रिकन लोकांचे पूर्वज या ठिकाणी राहिले होते असे संशोधकांना वाटते.

संबंधित बातम्या
Back to top button