महिलांमध्ये नैराश्याचे प्रमाण अधिक | पुढारी

महिलांमध्ये नैराश्याचे प्रमाण अधिक

नवी दिल्ली : आपण शारीरिक आरोग्याकडे जितके गांभीर्याने लक्ष देतो, तितके दुर्दैवाने मानसिक आरोग्याकडे देत नाही. सध्याच्या काळात तर डिप्रेशन म्हणजेच नैराश्य किंवा औदासिन्याचे रुग्ण झपाट्याने वाढत चालले आहेत. विशेषतः महिलांना डिप्रेशनचा त्रास जास्त असल्याचे एका संशोधनात समोर आले आहे. आज आपण जाणून घेणार आहोत काय आहेत या मागची कारणे.

‘जॅक एशिया’मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधन अहवालात महिला आणि पुरुषांमधील हृदयरोग तपासण्यात आला. असे आढळून आले की, नैराश्याने ग्रस्त पुरुषांमध्ये हृदयविकाराचा धोका 1.39 टक्के आणि महिलांमध्ये 1.64 टक्के होता. इतकेच नाही तर स्ट्रोक, हार्ट फेल्युअर, मायोकार्डियल इन्फेक्शन, एंजिना पेक्टोरिस आणि अट्रियल फायब्रिलेशनचा धोका देखील पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये जास्त होता. महिलांना डिप्रेशनचा जास्त त्रास का होतो याचे कारण समजून घेणेही गरजेचे आहे.

तज्ज्ञांच्या मते, महिलांच्या संपूर्ण आयुष्यात अनेक बदल होतात. गर्भधारणेपासून ते रजोनिवृत्तीपर्यंत अनेक टप्प्यांना सामोरे जावे लागते. त्यांना अनेक हार्मोनल बदलांमधूनही जावे लागते. यामुळे त्यांना नैराश्याचा त्रास होण्याची शक्यता असते. कारण सायटोकाइन्ससारख्या धोकादायक हार्मोन्सचा थेट परिणाम हृदयावर होतो. स्त्रिया जेव्हा माता बनतात, काही मुलांची काळजी घेतात, तेव्हा त्या मानू लागतात की, त्या आता काहीही करण्यास सक्षम नाहीत. आता सर्व काही पूर्वीसारखे राहिलेले नाही. याला पोस्टपर्टम डिप्रेशन असेही म्हणतात. त्यामुळे महिलांना नैराश्य येऊ लागते. त्यांना तणाव, चिडचिड आणि राग येतो. हे सुमारे 50-60 टक्के महिलांमध्ये घडते. महिलांमध्ये नैराश्य येण्याचे हेही कारण आहे.

स्त्रिया नैराश्यात जाण्याचे एक कारण पुरुषप्रधान समाज असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. जिथे त्यांच्यावर खूप सामाजिक दबाव असतो. त्यांना अनेक भेदभावांना सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांना मानसिक आरोग्यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, सध्या जगात सुमारे 30 कोटी लोक नैराश्याने ग्रस्त आहेत. उदासीनता पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये 50 टक्के अधिक सामान्य आहे. यापैकी 10 टक्क्यांहून अधिक गरोदर आणि नुकत्याच माता झालेल्या स्त्रिया आहेत. दरवर्षी 7 लाखांहून अधिक लोक नैराश्यामुळे आत्महत्या करतात. भारतातही ही समस्या झपाट्याने वाढत आहे.

Back to top button