Aliens : गव्हाच्या दाण्याइतक्या बर्फाने शोधता येतील ‘एलियन्स’ | पुढारी

Aliens : गव्हाच्या दाण्याइतक्या बर्फाने शोधता येतील ‘एलियन्स’

वॉशिंग्टन : अंतराळाच्या अनंत पसार्‍यात केवळ पृथ्वीवरच जीवसृष्टी आहे, असे म्हणणे हे कूपमंडूक वृत्तीसारखेच आहे. मात्र अद्यापही मानवाला पृथ्वीशिवाय अन्यत्र जीवसृष्टीचा छडा लागलेला नाही. सूक्ष्म जीवाणूच्या स्वरूपात का होईना, अन्यत्र जीवसृष्टी आहे का, याचा शोध सातत्याने घेतला जात असतो. आता संशोधकांना वाटते की, अंतराळात बर्फाळ खगोलांजवळून उड्डाण करीत असलेल्या अंतराळयानाच्या सहाय्याने असा शोध घेतला जाऊ शकतो. यासाठी केवळ बर्फाचे छोटेसे कण हवे आहेत. गव्हाच्या दाण्याइतक्या बर्फाच्या सहाय्यानेही तेथील जीवसृष्टीचा छडा लावता येऊ शकतो.

शनी किंवा गुरू या ग्रहांचे नव्वदपेक्षाही अधिक चंद्र आहेत. त्यापैकी काही चंद्रांकडे जीवसृष्टीच्या शोधासाठी कुतूहलाने पाहिले जात असते. शनीचा चंद्र एन्सिलाडस असो किंवा गुरूचा चंद्र युरोपा, तेथील बर्फाच्या अशा कणाच्या अभ्यासातून अनेक गोष्टींचा उलगडा होऊ शकतो. त्यांच्यामधून बर्फाचे फवारे बाहेर येत असतात. एन्सिलाडसच्या अलीकडेच करण्यात आलेल्या संशोधनानुसार तेथील बर्फाळ पृष्ठभागाखाली असलेल्या महासागरांमधून असे शक्तिशाली प्लम म्हणजेच फवारे निघत असतात. पृष्ठभागावरील भेगांमधून ते अंतराळात उडतात. त्यामध्ये बर्फाचे कणही असतात. त्यामध्ये जीवाणूंच्या पेशी आणि अन्य कार्बनिक अणूही असू शकतात, असे संशोधकांना वाटते.

एन्सिलाडसच्या अशा फवार्‍यांमधून जाणार्‍या यानांच्या सहाय्याने या बर्फामधील लपलेल्या जीवसृष्टीच्या संकेतांचा शोध घेतला जाऊ शकतो. अमेरिकेतील सिएटलच्या वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीतील संशोधक फॅबियन क्लेनर यांनी सांगितले की, एखाद्या छोट्याशा दाण्याइतक्या बर्फामध्येही आपण जीवाणू पेशींचा छडा लावू शकतो हे आश्चर्यकारक असले तरी शक्य आहे. अगदी थोडासा अंश जरी असला तरी आमची उपकरणे जीवाणूंना शोधू शकतात. एन्सिलाडस आणि युरोपाच्या प्लमच्या नमुन्याच्या विश्लेषणातून संबंधित चंद्रावर जीवसृष्टीला अनुकूल अणू आहेत की नाहीत हे समजून घेता येऊ शकते.

Back to top button