तीनशे वर्षांनंतरही कायम आहे सर्वात लांब नाकाचा विक्रम | पुढारी

तीनशे वर्षांनंतरही कायम आहे सर्वात लांब नाकाचा विक्रम

लंडन : पिनोशियो नावाची एक कार्टुन व्यक्तिरेखा आहे. हा मुलगा ज्यावेळी खोटे बोलतो, त्यावेळी त्याच्या नाकाची लांबी वाढते, असे दर्शवले आहे. अर्थात असे लांब नाक कुणाचे असते का, असा प्रश्नही अनेकांना पडतो. मात्र असा लांबलचक नाकाचा एक माणूस या पृथ्वीतलावर खरोखरच होता. त्याचे नाक खोटे बोलून नव्हे तर नैसर्गिकरीत्याच वाढले होते! जगात असे काही जुने विक्रम आहेत, जे आजपर्यंत कोणीही मोडू शकलेले नाही. त्यापैकी थॉमस वेडर यांचा असा विक्रम आहे, जो 300 वर्षांनंतरही कोणी मोडू शकलेला नाही. थॉमस यांनी 18 व्या शतकात सर्वात लांब नाकाचा अनोखा विक्रम केला होता. त्याचे नाक 7.5 इंच किंवा 19 सें.मी. लांब होते.

असे मानले जाते की, त्याने संपूर्ण यॉर्कशायरमध्ये लोकांना त्याचे नाक दाखवण्यासाठी प्रवास केला होता. परंतु त्या वेळी थॉमस यांच्या विचित्र नाकाचा फोटो काढण्यासाठी कॅमेरा नव्हता. थॉमस यांच्या 7.5 इंच लांब नाकासाठी गिनिज वर्ल्ड रेकॉर्डने त्यांच्या पुस्तकात नाव नोंदवले आहे. अधिकृत वेबसाईटनुसार, ‘1770 च्या दशकात इंग्लंडमध्ये राहणार्‍या आणि सर्कसमध्ये काम करणार्‍या थॉमस वेडर्स यांचे नाक 7.5 इंच लांब असल्याचे ऐतिहासिक पुरावे आहेत.’ दस्तऐवजांनुसार त्यांचा मृत्यू झाला तेव्हाही त्यांचे नाक नेहमीसारखेच होते.

एका मेणाच्या पुतळ्यावरून वेडर यांच्या नाकाच्या लांबीची कल्पना येऊ शकते. थॉमस वेडर्स यांचा हा मेणाचा पुतळा बिलिव्ह इट ऑर नॉट म्युझियममध्ये ठेवण्यात आला आहे. त्यांच्या जीवनाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. परंतु त्यांचा जन्म त्याच शहरात झाला. अलीकडेच वेडर्स यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यातील त्यांचे लांब नाक पाहून यूजर्स आश्चर्यचकित झाले होते. एक वापरकर्ता म्हणाला, ‘हे नक्की काय आहे? ट्यूमर? लांबी? अनुवांशिक दोष? मला अनेक प्रश्न आहेत.’ वेडर्स यांचा विक्रम त्याच्या शारीरिक स्वरूपाशी संबंधित होता, जो आजपर्यंत कोणीही मोडू शकले नाही!

Back to top button