जगभरातील ५२ टक्के रोबो चीनमध्ये; सर्वाधिक बेरोजगारीही चीनमध्येच! | पुढारी

जगभरातील ५२ टक्के रोबो चीनमध्ये; सर्वाधिक बेरोजगारीही चीनमध्येच!

न्यूयॉर्क : जगभरातील रोबोंमुळे चीनमध्ये सर्वात जलद बेरोजगारी वाढत असल्याचे निरीक्षण अमेरिकन थिंक टँक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेटिव्ह फाऊंडेशनच्या (आयटीआयएफ) एका अभ्यासातून नोंदवले गेले आहे. या अभ्यासानुसार, चीनमध्ये आतापर्यंत वेगवेगळ्या उद्योग, व्यवसायात जितके रोबो तैनात असल्याचा अंदाज वर्तवला, त्यापेक्षा हे प्रमाण साडेबारा टक्क्यांनी अधिक राहिले आहे. चीन सातत्याने ऑटोमेशनच्या दिशेने सरकत असताना या देशातील विविध उद्योग, व्यवसायातील नोकर्‍यादेखील झपाट्याने कमी होत आहेत.

आयटीआयएफचे अध्यक्ष रॉबर्ट अ‍ॅटकिन्सन यांनी जगभरात जितके रोबो आहेत, त्यातील 52 टक्के रोबो फक्त चीनमध्येच असल्याचे यावेळी सांगितले. आश्चर्याची बाब म्हणजे, दशकभरापूर्वी ही संख्या केवळ 14 टक्के इतकी होती. चीन आता सर्वात मोठा इंडस्ट्रीयल रोबो मार्केट बनला आहे. याउलट अमेरिकेने मात्र जितके रोबो आवश्यक आहेत, त्या तुलनेत 30 टक्के कमी रोबो तैनात केले आहेत.

चीनमध्ये सध्या मॅन्युफॅक्चरिंग, लॉजिस्टिक्स, हॉस्पिटॅलिटी, हेल्थकेअर, कन्स्ट्रक्शन या क्षेत्रात सर्वाधिक रोबो तैनात आहेत. चीनमधील स्थानिक रोबो उद्योग सॉफ्टवेअरसाठी पूर्णपणे अमेरिका व जपानसारख्या विकसित देशांवर अवलंबून आहे. याशिवाय, ते या क्षेत्रातील नव्या संशोधनातही पूर्णपणे मागे आहेत. आश्चर्य म्हणजे, रोबो उद्योगातील 80 टक्के खर्च हा सॉफ्टवेअरवरच होतो.

Back to top button