‘या’ श्वानालाही लागलीय मोबाईलची सवय! | पुढारी

‘या’ श्वानालाही लागलीय मोबाईलची सवय!

नवी दिल्ली : सतत मोबाईल फोन हातात घेऊन बसणारे अनेक महाभाग जगाच्या पाठीवर आहेत. विशेषतः याच कारणामुळे मुलांना कानीकपाळी ओरडून ‘आता मोबाईल ठेव,’ असे ओरडून सांगणारे आई-बाप घरोघरी पाहायला मिळतील. मोबाईलची सवय अशी मनुष्यप्राण्यालाच लागली आहे, असे नाही. एक श्वान पिल्लूही असे मोबाईलच्या आहारी गेले आहे. ते निवांत उशीला टेकून, उताणे पडून मोबाईल पाहत असते. अर्थातच, त्याच्या या सुखसोयीमागेही द्विपाद मनुष्यप्राणीच आहे!

या मोबाईलवेड्या श्वानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक लोकांना गंमत वाटली आणि अनेक लोक चकितही झाले. गोल्डन रिट्रायव्हर प्रजातीच्या श्वानाचे हे गोंडस पिल्लू मऊशार गादीवर आरामात पडून मोबाईल पाहण्याचा आनंद घेत असताना यामध्ये दिसते. डोळ्याची पापणीही न लवता ते हा मोबाईल पाहत आहे. मऊ गादी, डोक्याला चिमुकली उशी आणि आजूबाजूला पडदा, अशा थाटात हे श्वानमहाशय मोबाईल पाहण्याचा आनंद लुटत आहेत. इन्स्टाग्रामवर एक पेट लव्हर यूजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यावर अनेक यूजर्सनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

Back to top button