दुःख सांगण्याचे अनोखे दुकान! | पुढारी

दुःख सांगण्याचे अनोखे दुकान!

बीजिंग ः जगाच्या बाजारात अनेक प्रकारांची दुकाने पाहायला मिळतात. मात्र, कधी दुःख सांगण्याचे दुकान पाहिले आहे का? जीवनाच्या रहाटगाडग्यात अडकलेल्या लोकांना घटकाभर थांबून एकमेकांशी सुख-दुःखाच्या गोष्टी बोलण्यासही हल्ली वेळ नाही. अशा स्थितीत आता चीनमधील ‘दुःख सांगण्याचे दुकान’ चर्चेत आले आहे.

हल्लीच्या धावपळीच्या जगात कुणाशी मन मोकळेपणाने बोलायला कुणीच नसताना एक माणूस चक्क ‘दुःख सांगण्याचे दुकान’ उघडून बसला आहे. तो उदास लोकांना स्वतः बोलावून त्यांची दुःख, समस्या ऐकतो. शिवाय अशा लोकांना चहाही देतो. चीनमध्ये एका फ्रेंच ब्लॉगरने असे चहाचे दुकान सुरू केले आहे. तो फक्त लोकांचे प्रश्नच ऐकत नाही, तर त्यांच्या समस्यांवर समाधानकारक उत्तरेदेखील देतो.

साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, रुले ऑलिव्हर हर्व असे या व्यक्तीचे नाव आहे. तो झेजियांग प्रांतातील हांगझोऊ शहरात राहतो आणि चिनी सोशल मीडियावर तो आपले अकाऊंट चालवतो. त्याने रस्त्यावर एक स्टॉल उघडला आहे, जिथे तो लोकांना त्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी त्यांना चक्क आमंत्रित करतो. यावेळी तो त्यांना चहाही पाजतो. त्याने दोन खुर्च्या ठेवल्या आहेत, ज्यात एकावर तो स्वत: बसतो आणि दुसर्‍यावर तो पुढच्या माणसाला बसवतो आणि शांतपणे ऐकतो.

यासंबंधीचे अनेक व्हिडीओही त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. हर्व लोकांना त्यांच्या समस्या लिखित स्वरूपात आणण्याचा सल्ला देतो आणि ते दोघेही एकत्र बसून तोडगा काढण्याचा प्रयत्न करतील. हर्वचे सोशल मीडियावर 1 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि लोक त्याने सांगितलेल्या कथादेखील खूप पसंत करतात. काही त्यांना त्यांच्या अभ्यासाच्या समस्यांबद्दल सांगतात, तर काही त्यांच्या जीवनातील समस्यांबद्दल सांगतात. हर्वेही त्यांच्या बाजूने तोडगा काढण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. एवढंच नव्हे तर यूझर्स त्याच्या शांत आणि गोड स्वभावाचे कौतुक करत.

Back to top button