ऑस्ट्रेलियात इतके विषारी जीव का आहेत? | पुढारी

ऑस्ट्रेलियात इतके विषारी जीव का आहेत?

कॅनबेरा : ऑस्ट्रेलियात अनेक विषारी जीवांचा सुळसुळाट आहे. त्यामध्ये कोळी, साप, जेलीफिश, ऑक्टोपस, विशिष्ट मुंग्या, माशा आणि अगदी प्लॅटिपसच्या प्रजातींचाही समावेश आहे. तिथे इतक्या मोठ्या संख्येने प्राणी विषाचे शस्त्र का वापरतात, हा एक संशोधकांना पडलेला प्रश्न आहे. ऑस्ट्रेलियाची एक खंड म्हणून निर्मिती होण्यापूर्वीपासूनच याठिकाणी यापैकी अनेक जीवांचे अस्तित्व आहे. मात्र, सापांबाबतची कहाणी तर वेगळीच आहे. ते ऑस्ट्रेलिया एक वेगळा खंड बनल्यावर आले होते.

ऑस्ट्रेलिया 10 कोटी वर्षांपूर्वी एक वेगळा खंड बनला. दक्षिणेकडील सुपरकाँटीनंतर किंवा महाखंड असलेल्या गोंडवानाचे विभाजन झाल्यावर त्याची निर्मिती झाली, असे इंग्लंडच्या स्वान्सिया युनिव्हर्सिटीतील इव्होल्युशनरी बायोसायन्सचे प्राध्यापक केव्हिन अर्ब्युकल यांनी सांगितले. ऑस्ट्रेलियातील विषारी कीटकांचे तेथील अस्तित्व अशा विभाजनाच्या किती तरी पूर्वीचे आहे. ऑस्ट्रेलिया वेगळा झाल्यावर काही विषारी जीव या खंडाला चिकटले. त्यामध्ये ट्रॅपजॉ अँटस् या मुंग्यांचा (जीनस ओडोंटोमॅचस) समावेश आहे. त्यांचा दंश अतिशय वेदनादायक असतो.

या मुंग्या ऑस्ट्रेलियाशिवाय जगाच्या अन्यही भागात राहू शकल्या असत्या. मात्र, त्या ऑस्ट्रेलियातच दिसून येतात. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियन बुलडॉग अँटस् (जीनस मिर्मेसिया) या मुंग्यांचा दंशही अतिशय घातक असतो. 1936 पासून या मुंग्यांमुळे तीन माणसांचा मृत्यू झाल्याचीही नोंद आहे. गोंडवानाच्या विभाजनापूर्वीच त्या त्याच्यावर होत्या आणि ऑस्ट्रेलिया वेगळा झाल्यावर त्या या खंडावरही ठाण मांडून राहिल्या. फनेल-वेब स्पायडर्स (हॅड्रोनिची आणि अट्राक्स) हे केवळ ऑस्ट्रेलियातच आढळणारे असे कोळी आहेत जे आपल्या विषारी दंशाने माणसालाही मारू शकतात.

1981 मध्ये त्यांच्या विषावर औषध निघाले, तोपर्यंत त्यांच्या दंशाने तेरा माणसांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. ऑस्ट्रेलियाच्या आसपासच्या समुद्रातील ऑक्टोपस, स्क्वीड, कटलफिशच्या अनेक प्रजाती 300 दशलक्ष वर्षांपासून अस्तित्वात आहेत. ज्यावेळी हा खंड उत्तरेकडे सरकून अधिक ऊबदार बनला त्यावेळी त्याने अनेक सरीसृपांना आकर्षित केले. नाग, माम्बा, कोरल स्नेक, तैपन यासारखे अनेक जहाल विषारी सर्प ऑस्ट्रेलियात वावरू लागले. ऑस्ट्रेलियातील 220 सर्प प्रजातींपैकी 145 प्रजाती अतिशय विषारी आहेत.

याचा अर्थ तेथील सर्प लोकसंख्येपैकी 65 टक्के या अत्यंत घातक विषारी आहेत. जगाचा विचार करता जगातील सापांपैकी 15 टक्के साप विषारी आहेत. ऑस्ट्रेलियाचे अस्तित्व निर्माण होण्यापूर्वीच तिथे 50 कोटी वर्षांपासून जेलीफिशचे अस्तित्व आहे. त्यामध्ये बॉक्स जेलीफिशचा (कॅरुकिया बार्नेसी) समावेश आहे. असे असले तरी ऑस्ट्रेलियातच विषारी जीव अधिक आहेत, त्यामध्ये विशेष असे काही आहे, असे म्हणता येणार नाही, असे अर्ब्युकल यांना वाटते! हा एक विशाल असा ट्रॉपिकल एरिया असल्याने ही बाब सामान्यच असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Back to top button