पृथ्वीवर न आढळणार्‍या धातूचे तीन हजार वर्षांपूर्वीचे शस्त्र | पुढारी

पृथ्वीवर न आढळणार्‍या धातूचे तीन हजार वर्षांपूर्वीचे शस्त्र

बर्न : स्वित्झर्लंडमधील ‘बिएल’ नावाच्या सरोवरात 19 व्या शतकात बाणाच्या टोकासारखे एक शस्त्र सापडले होते. हे शस्त्र तब्बल तीन हजार वर्षांपूर्वीचे असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे ते अशा धातूपासून बनवलेले आहे जे पृथ्वीवर आढळत नाही. त्यामुळे त्याला ‘एलियन’ हत्यारही म्हटले जात आहे. बॉन युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी या शस्त्राची आता तपासणी केली असून ते एका उल्केपासून बनलेले असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे शस्त्र 1.5 इंच लांबीचे असून त्याचे वजन केवळ 0.102 औंस इतके आहे.

स्वित्झर्लंडमधील कांस्य युगाच्या काळातील मोरीगेन या पुरातत्त्वीय ठिकाणी हे हत्यार सापडले होते. ते ‘अ‍ॅल्युमिनम-26’ पासून बनवलेले आहे. हा अ‍ॅल्युमिनियम धातूच्या केमिकल एलिमेंटचा एक रेडियोअ‍ॅक्टिव्ह आयसोटोप आहे. हा धातू आपल्या सुरुवातीच्या सौर मालिकेत मोठ्या प्रमाणात आढळत होता. सुरुवातीला मानले जात होते की हा आयसोटोप केवळ सुपरनोव्हा म्हणजेच तार्‍यांच्या महास्फोटाच्या किंवा विशाल तार्‍यांच्या चहुबाजूला आढळतो.

मात्र, अलीकडेच करण्यात आलेल्या संशोधनानुसार समजले की सूर्यासारखे तारे आपल्या जन्मानंतरच ते निर्माण करू शकतात. ही रहस्यमय सामग्री कोणत्याही प्रकारे पृथ्वीवर असणे ही स्वाभाविक बाब नाही. त्यामुळे एका प्राचीन बाणामध्ये तिचा वापर होणे ही आश्चर्यकारक गोष्ट आहे. या सामग्रीचा छडा लावण्यासाठी वैज्ञानिकांनी त्या काळात कोसळलेल्या उल्कांची माहिती घेतली. त्यावेळी आढळले की असा धातू असलेल्या केवळ तीन उल्का तिथे कोसळल्या होत्या.

एक उल्का इस्टोनियामध्ये पडली होती. हे ठिकाण स्वित्झर्लंडपासून दूर असले तरी या शस्त्रात वापरलेला धातू त्याच उल्केचाही असू शकतो. असेही मानले जाते की कामासाईट आणि टिआनाईट खनिज पृथ्वीवर केवळ यामुळेच आढळतात कारण ते अंतराळातून कोसळलेल्या उल्कांमध्ये होते. या खनिजाचा वापर फॅशनसाठी केला जातो. स्वित्झर्लंडमधील हे हत्यार 19 व्या शतकात बिएलमध्ये सापडले होते जे पश्चिम स्वित्झर्लंडच्या जूरा परिसरात आहे. हे हत्यार सध्या बर्न हिस्ट्री म्युझियममध्ये ठेवले आहे.

Back to top button