Planet : तार्‍यामध्ये स्फोट आणि एका ग्रहाने गमावले वातावरण! | पुढारी

Planet : तार्‍यामध्ये स्फोट आणि एका ग्रहाने गमावले वातावरण!

वॉशिंग्टन : हबल स्पेस टेलिस्कोपने आपल्या सौरमंडळाच्या बाहेर एका जवळच्या ग्रहाचे (Planet) निरीक्षण केले आहे. ‘हबल’ ला आढळले की संबंधित ग्रहाच्या तार्‍यावर झालेल्या स्फोटानंतर या ग्रहाचे वातावरण नष्ट झाले आहे. एखादा तारा किती धोकादायकही ठरू शकतो याचे हे उदाहरण आहे. गेल्यावेळी ‘हबल’ने या ग्रहाचे निरीक्षण केले होते, त्यावेळी त्यामध्ये काही वेगळे नव्हते. मात्र, कालांतराने त्याचे निरीक्षण केल्यावर या ग्रहाने आपले वातावरण गमावल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले.

या ग्रहाचा तारा एक ‘रेड ड्वॉर्फ स्टार’ म्हणजेच लाल खुजा तारा आहे. त्याला ‘एयू मायक्रोस्कोपी’ किंवा ‘एयू माईक’ असे म्हटले जाते. हा तारा आपल्या सौरमंडळापासून 32 प्रकाशवर्ष अंतरावर आहे. एखादा प्रकाशकिरण एका वर्षात जितके अंतर कापतो त्याला ‘1 प्रकाशवर्ष’ असे म्हटले जाते. खगोलीय घटनांमध्ये 32 प्रकाशवर्ष हे तुलनेने कमीच अंतर मानले जाते. इतक्या अंतरावर हा तारा आणि ग्रह आहे. ‘नासा’ने आतापर्यंत ज्या ग्रहमालिका शोधल्या आहेत त्यापैकी ही सर्वात तरुण आहे. हा तारा दहा कोटी वर्षांपेक्षाही कमी वयाचा आहे. आपल्या सूर्याचे वय 4.6 अब्ज वर्षांचे आहे. त्या तुलनेत तो अतिशय कमी वयाचा आहे. या ग्रह प्रणालीला ‘नासा’च्या ‘स्पित्झर स्पेस टेलिस्कोप’ आणि ‘ट्रांजिटिंग एक्झोप्लॅनेट सर्व्हे सॅटेलाईट’ने 2020 मध्ये शोधले होते. या ग्रहाला ‘एयू माईक बी’ असे नाव देण्यात आले आहे. तो 8.46 दिवसांमध्ये आपल्या तार्‍याभोवतीची एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. याचा अर्थ या ग्रहावरील वर्ष केवळ 8.46 दिवसांचे असते! या ग्रहाने आता त्याच्या तार्‍याच्या रेडिएशनमुळे आपले वातावरण गमावले आहे. या तार्‍यावरील स्फोटाने ग्रहाचे हायड्रोजन वातावरण बाष्पित केले. या ग्रहमालिकेत एकूण दोन ग्रह आहेत. ‘द अस्ट्रोनॉमिकल जर्नल’ या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. संशोधक केघली रॉकक्लिफ यांनी सांगितले की एखाद्या ग्रहाचे वातावरण अचानक इतके गायब होईल की त्याचा पत्ताच लागू नये, याची आम्ही कल्पनाही केलेली नव्हती!

-हेही वाचा

Umangot River : ‘इथे’ होडी जणू काही हवेतच तरंगते!

Back to top button