Umangot River : ‘इथे’ होडी जणू काही हवेतच तरंगते! | पुढारी

Umangot River : ‘इथे’ होडी जणू काही हवेतच तरंगते!

शिलाँग : सोबतची छायाचित्रे पाहिल्यावर आपल्याला वाटू शकते की होडी जणू काही हवेतच तरंगत आहे. ‘स्फटिकासारखे नितळ पाणी’ अशी उपमा खरोखरच ज्या नदीला देता येऊ शकते, अशा नदीमधील या होड्या आहेत. ईशान्य भारतातील मेघालय या राज्यात ही नदी आहे. या नदीचे नाव आहे ‘उमंगोट’ (Umangot River). ही भारतातील सर्वात स्वच्छ नदी म्हणून ओळखली जाते. उमंगोट नदीचे (Umangot River)  पाणी अगदी काचेसारखे पारदर्शक आणि स्वच्छ आहे.

ही नदी (Umangot River) शिलाँगपासून 85 किलोमीटर अंतरावर, भारत-बांगलादेश सीमेजवळील पूर्व जयंतिया हिल्स जिल्ह्याच्या दावकी या गावाजवळून वाहते. लोक या स्वच्छ व सुंदर परिसराला ‘डोंगरात लपलेला स्वर्ग’ असे म्हणतात. याठिकाणी राहणारे लोक स्वच्छतेच्या बाबतीत अत्यंत जागरूक आहेत. साफसफाई ही या लोकांच्या संस्काराचाच एक भाग आहे. त्यामुळे त्यांनी आपले गाव आणि ही नदीही अत्यंत काळजीपूर्वक स्वच्छ ठेवलेली आहे. ही नदी ज्या दावकी, दारंग, शेनान्गडेंग अशा गावांमधून वाहते, त्या गावांमधील लोक नदीच्या स्वच्छतेची काळजी घेत असतात. हवामान किंवा पर्यटकांच्या संख्येचा विचार करून या नदीच्या स्वच्छतेची सार्वजनिक मोहीम आखली जाते. महिन्यातून एकदा, दोन वेळा किंवा चार दिवस ‘कम्युनिटी डे’ असतात. या दिवशी गावातील प्रत्येक घरातील किमान एक व्यक्ती नदीच्या साफसफाईसाठी हजर होते. दावकी गावात सुमारे 300 घरे आहेत आणि तेथील सर्व कुटुंबे नदीची साफसफाई करतात. कचरा फैलावल्यास 5 हजार रुपयांपर्यंतचा दंड होतो. या गावात नोव्हेंबर ते एप्रिलदरम्यान पर्यटक मोठ्या संख्येने येतात. पावसाळ्यात बोटिंग बंद असते.

-हेही वाचा

पिळदार शरीरासाठी नको नशा… होऊ शकते जीवनाची दुर्दशा

कोल्हापूर : वारणानगर ९ कोटी चोरी प्रकरणातील संशयित सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा खून

Back to top button