अंटार्क्टिकावर डायनासोर काळात होती घनदाट जंगले | पुढारी

अंटार्क्टिकावर डायनासोर काळात होती घनदाट जंगले

न्यूयॉर्क : आजच्या घडीला पृथ्वीचा जो भूगोल आहे, असा तो पूर्वी नव्हता. पृथ्वीचे दोन्ही ध्रुवीय भाग सध्या बर्फाने झाकले गेले आहेत; मात्र कोट्यवधी वर्षांपूर्वी असे जराही नव्हते. दक्षिण ध्रुवीय अंटार्क्टिका भागात असे अनेक डायनासोर युगादरम्यानचे पुरावे मिळाले आहेत की, त्यामधून या भागात उष्ण जल, वायू होते, असे स्पष्ट होते.

शास्त्रज्ञांना संशोधनादरम्यान राखेचे अवशेष मिळाले आहेत. या राखेचे संशोधन केले असता असे स्पष्ट झाले की, क्रिटेशियस काळात म्हणजे डायनासोर युगात अंटार्क्टिका हा भाग घनदाट जंगलांनी समृद्ध होता. यामुळे तेथे आगही लागत होती. याच आगीचे कारण समजून घेण्याचा प्रयत्न केला असता शास्त्रज्ञही चकित झाले.

अंटार्क्टिकाबाबत लोकांना नेहमीच असे वाटते की, या भागात सुरुवातीपासून बर्फाच्या विशाल चादरी अस्तित्वात आहेत; मात्र आजच्या घडीला हा भाग बर्फाळ असला, तरी एकेकाळी तो जैविक आणि भूगर्भीय हालचालींबाबत अत्यंत सक्रिय होता.

सुमारे 7.5 कोटी वर्षांपूर्वी म्हणजे क्रिटेशियस काळात ज्यावेळी पृथ्वी आपल्या सर्वात उष्ण काळातून वाटचाल करत होती, त्यावेळी अंटार्क्टिकामध्ये घनदाट जंगले असावयाची. तेथे डायनासोरचा संचार असावयाचा. ब्राझीलच्या फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ पेर्नामबुकोच्या संशोधकांच्या नेतृत्वाखालील पथकाने अंटार्क्टिकावरील जेम्स रॉस बेटाचा 2016 मध्ये दौरा केला. यावेळी त्यांना दगडी कोळशाच्या राखेचे नमुने मिळाले. यातून कधी काळी जंगल होते आणि त्या जंगलाला आग लागली होते, हेच निष्पन्‍न होते.

Back to top button