नदीत सापडला 9.4 फुटांचा मासा | पुढारी

नदीत सापडला 9.4 फुटांचा मासा

रोम : समुद्रात मोठ्या आकाराचे मासे सापडणे ही काही नवलाईची बाब नाही. मात्र, गोड्या पाण्यात, नदीत असे मासे सापडणे ही एक दुर्मीळ बाब असते. आता इटलीतील ‘पो’ नावाच्या नदीत एका मच्छीमाराला तब्बल 9.4 फूट लांबीचा कॅटफिश सापडला आहे. या माशाने दोनच महिन्यांपूर्वी नदीत सर्वात मोठा मासा पकडण्याबाबत झालेला विक्रम मोडीत काढला आहे!

‘पो’ ही इटलीतील सर्वात लांब नदी आहे. या नदीच्या ऊबदार पाण्यात आता हा आतापर्यंत सापडलेला सर्वात मोठा मासा पकडण्यात आला. अ‍ॅलेस्सांद्रो बियानकार्डी नावाच्या मच्छीमाराने उत्तर इटलीतील लोम्बार्डी भागात हा मासा पकडला. यापूर्वी सापडलेल्या सर्वात मोठ्या ‘वेल्स कॅटफिश’पेक्षा (सिलुरस ग्लॅनिस) हा मासा 1.6 इंचाने अधिक मोठा आहे. बियानकार्डी याने सांगितले की या माशाला पाण्याबाहेर आणत असतानाच मी ओळखले होते की हा एक भला मोठा मासा आहे.

मी गेली 23 वर्षे मासेमारी करतो; पण इतका मोठा मासा कधीही पाहिला नव्हता. या माशाला काठावर आणून बियानकार्डी व त्याच्या सहकार्‍यांनी त्याची लांबी मोजली, छायाचित्रे टिपली व त्याला पुन्हा नदीत सोडून दिले. त्याच्या मोजमापाच्या नोंदी इंटरनॅशनल गेम फिश असोसिएशनकडे पाठवण्यात आल्या. वेल्स कॅटफिश हे युरोपमधील गोड्या पाण्यातील सर्वात मोठे मासे असतात. ट्यूरिन आणि पियासेन्झासारख्या शहरांमधून वाहणार्‍या पो नदीत असे अनेक मासे आढळतात. 12 एप्रिलला पो नदीमध्येच 9.2 फूट लांबीचा वेल्स कॅटफिश सापडला होता.

Back to top button