पर्सिव्हरन्स रोव्हरचा ‘मित्रा’ला गुडबाय! | पुढारी

पर्सिव्हरन्स रोव्हरचा ‘मित्रा’ला गुडबाय!

न्यूयॉर्क : मंगळ ग्रहावर ‘नासा’चे पर्सिव्हरन्स रोव्हर जीवसृष्टीचे पुरावे शोधत आहे. गेल्या दोन वर्षांपासून हे रोव्हर मंगळाच्या पृष्ठभागावर आहे. तेथून ते मंगळाची अनेक सुंदर छायाचित्रेही पृथ्वीवर पाठवते. तेथील दगड-मातीचे नमुनेही या रोव्हरने गोळा केले आहेत. विशेष म्हणजे या रोव्हरच्या एका चाकात मंगळावरील एक दगडही अडकला होता. रोव्हरने जणू काही हा दगड ‘पाळला’ असल्यासारखा तो सतत या रोव्हरबरोबर असायचा. दोघांची जणू ‘मैत्री’च जमली होती. आता मात्र या दगडाची साथ सुटली आहे!

गेल्या वर्षभरापासून हे रोव्हर या दगडाला सोबत घेऊन वाटचाल करीत होते. मात्र, आता ते त्याच्यासमवेत राहिलेले नाही. पर्सिव्हरन्स रोव्हरच्या सुपरकॅम उपकरणाचे प्रभारी डॉ. ग्वेनेल कारावाका यांनी सांगितले की आमच्या टीमला अलीकडेच लक्षात आले की हा दगड आता हरवला आहे. रोव्हरने पाठवलेल्या काही ताज्या छायाचित्रांवरून हे दिसून आले.

हा दगड पर्सिव्हरन्स मार्स रोव्हरच्या पुढील बाजूतील डाव्या चाकामध्ये अडकला होता. ‘फेअरवेल रॉक फ्रेंड’, तुझी आठवण येईल! त्याने आमच्यासमवेत 427 सोल म्हणजेच पृथ्वीच्या एक वर्षापेक्षा अधिक काळ साथसंगत केली. सुमारे दहा किलोमीटरच्या प्रवासात हा दगड सोबत होता. पर्सिव्हरन्स रोव्हरचे लक्ष्य सीलबंद ट्यूबमध्ये तेथील खडक-मातीचे नमुने घेणे हे आहे. या ट्यूब्स 2030 च्या अखेरीस पृथ्वीवर आणल्या जातील व या नमुन्यांवर संशोधन होईल.

Back to top button