मंदिरात दान केला रोबोटिक हत्ती! | पुढारी

मंदिरात दान केला रोबोटिक हत्ती!

तिरुवनंतपूरम : दक्षिण भारतातील अनेक मदिरांमध्ये, विशेषतः केरळमधील मंदिरांमध्ये हत्ती दिसून येतात. अनेक श्रीमंत लोक हत्ती विकत घेऊन मंदिरांमध्ये दान करीत असतात. मंदिरांमधील उत्सवावेळी, मिरवणुकीवेळी अशा पाळीव हत्तींचा वापर केला जात असे. मात्र, आता हत्ती दान करणे किंवा मंदिरात पाळणे ही प्रथा कमी होत आहे. मंदिरातील उत्सवासाठी हत्तींना बंदिस्त बनवण्याऐवजी किंवा हत्ती भाड्याने घेण्याऐवजी आता एक अद्ययावत पर्याय शोधण्यात आला आहे. त्याची झलक एका मंदिरात दिसून आली. केरळमधील त्रिशूर येथील इरिंजादापल्ली श्रीकृष्ण मंदिरात नुकताच 11 फूट उंचीचा आणि 800 किलो वजनाचा रोबोटिक हत्ती दान करण्यात आला. हा एक लोखंडी फ—ेमने बनवलेला असून बाहेरून रबर कोटिंग करण्यात आले आहे. हत्तीचे नाव ‘रमन’ ठेवण्यात आले आहे. मंदिरात ‘नादायिरुथल’ या धार्मिक विधीदरम्यान हत्तीला भेट देण्यात आले आहे.

हा हत्ती दाक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री पार्वती थिरुवोथू यांनी प्राण्यांच्या हक्कांवर काम करणार्‍या ‘पीपल फॉर एथिकल ट्रिटमेंट ऑफ अ‍ॅनिमल्स’ (पेटा इंडिया) च्या सहकार्याने बनवला आहे. हा तयार करण्यासाठी 5 लाख रुपये खर्च आला. मंदिराचे पुजारी राजकुमार नंबूदिरी म्हणाले की, रोबोटिक हत्ती मिळाल्याने मंदिर समिती आनंदी आहे. आम्हाला आशा आहे की हत्तींच्या पूजेसाठी इतर मंदिरांमध्ये रोबोटिक हत्तींचा वापर केला जाईल. आतापर्यंत पूजेसाठी खरा हत्ती भाड्याने घ्यायचा खूप खर्च व्हायचा. अलीकडे हत्ती हिंसक होण्याच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे मंदिराने ही प्रथा बंद केली होती. कलाकार दुबईसाठी हत्ती बनवतात हे ऐकल्यावर आम्ही त्यांना भेटलो आणि आमच्यासाठी हत्ती बनवायला सांगितले. रोबोटिक हत्तीची खास गोष्ट म्हणजे तो चालू शकतो. हत्तीचे डोके, कान आणि शेपूट सर्व विजेच्या सहाय्याने फिरतात. त्याच्या पाठीवर खर्‍या हत्तींप्रमाणे पाच लोक बसू शकतात. त्याचा उपयोग मिरवणुकीत करता येऊ शकतो. हा हत्ती शेपटीवर बनवलेल्या स्विचने चालवण्यास सक्षम असेल. दुबई शॉपिंग फेस्टिव्हलसाठी हत्तीची शिल्पे बनवणार्‍या त्रिशूर येथील कलाकारांच्या एका गटाने हत्ती तयार केला आहे.

Back to top button