एक हजार वर्षांपूर्वी मादागास्करमध्ये होती विशाल कासवे | पुढारी

एक हजार वर्षांपूर्वी मादागास्करमध्ये होती विशाल कासवे

लंडन : सुमारे एक हजार वर्षांपूर्वी सध्याच्या मादागास्करच्या भूमीवर विशालकाय कासवं वावरत होती. ही शाकाहारी कासवं अनेक प्रकारच्या वनस्पती फस्त करीत होती व त्यांचा आहारही दांडगाच होता. मॅमथ हत्ती किंवा अन्य महाकाय शाकाहारी प्राण्यांप्रमाणेच त्यांचाही इको-सिस्टीमवर मोठा प्रभाव होता, असे एका नव्या संशोधनातून दिसून आले आहे.

मादागास्कर आणि पश्चिम हिंद महासागरातील अन्य बेटांवरील महाकाय कासवांचा वंश शोधत असताना संशोधकांना या प्राचीन प्रजातीचा शोध लागला. या लुप्त झालेल्या प्रजातीमधील एका कासवाच्या मागील पायाचे हाडही संशोधकांना सापडले आहे. त्याच्या साहाय्याने संशोधकांनी त्याच्या डीएनएचाही अभ्यास केला. त्यावरून असे सिद्ध झाले की ही कासवं वेगळ्याच प्रजातीची होती. संशोधकांनी या प्रजातीला ‘अ‍ॅस्ट्रोचेलिस रॉजरबौरी’ असे नाव दिले. ‘सायन्स अ‍ॅडव्हान्स’ या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. फे्ंरच हर्पेटोलॉजिस्ट आणि पश्चिम हिंदी महासागरातील विशालकाय कासवांबाबतचे तज्ज्ञ रॉजर बौर (1947-2020) यांचे नाव या प्रजातीला देण्यात आले आहे. ही प्रजाती नेमकी कधी लप्त झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, जो नमुना सापडलेला आहे तोच एक हजार वर्षांपूर्वीचा आहे. ही कासवं 272 किलो वजनाची होती आणि त्यांच्यामुळे तेथील इको-सिस्टीमवर मोठा प्रभाव पडत होता.

Back to top button