Animal Cyborg : आता उंदीरही सैन्यात बजावणार कामगिरी | पुढारी

Animal Cyborg : आता उंदीरही सैन्यात बजावणार कामगिरी

नवी दिल्ली : श्वानपथकासह अन्य काही प्राण्यांचा सैन्यात विशिष्ट कामांसाठी वापर केला जात असतो. आता पहिल्यांदाच उंदरांचाही असाच सैन्यात वापर केला जाणार आहे. भारतीय सैन्य दलात ‘रिमोट कंट्रोल’ने चालणार्‍या ‘रॅट’ म्हणजेच ‘अ‍ॅनिमल सायबोर्ग’Animal Cyborg)चा समावेश होऊ शकतो. लष्करी कारवाईदरम्यान, शत्रूवरील हल्ल्यापूर्वी शत्रूची स्थिती जाणून घेण्यासाठी लष्कर या उंदरांचा वापर करेल. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ)ची असिमेट्रिक टेक्नॉलॉजी लॅब अशा अ‍ॅनिमल सायबोर्गवर काम करत आहे.

हा प्रकल्प वर्षभरापूर्वी सुरू झाला होता. आता तो दुसर्‍या टप्प्यात आहे. एका वृत्तानुसार हा प्रकल्प लवकरच आकार घेईल. 108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये या प्रकल्पावर चर्चा झाली. ‘डीआरडीओ यंग सायंटिस्ट लॅबोरेटरी असिमेट्रिक टेक्नॉलॉजी’चे संचालक पी. शिवप्रसाद यांनीही या प्रकल्पाचे सादरीकरण केले.

या तंत्रात जिवंत प्राण्यावर शस्त्रक्रिया करून त्यांच्या शरीरात इलेक्ट्रॉनिक उपकरण बसवले जाते. अशा प्रकारे विशिष्ट प्रमाणात आवश्यक शक्ती वाढवून कार्य केले जाते. याला ‘अ‍ॅनिमल सायबोर्ग’ म्हणतात. ‘अ‍ॅनिमल सायबॉर्ग्स’चा उपयोग सैन्य संशोधन, मदत आणि उपचारांमध्ये केला गेला आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा भारतात पूर्ण झाला आहे. या पायरीमध्ये उंदरांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांच्या शरीरात इलेक्ट्रोड बसवण्यात आले आहेत.

आता त्यांच्याकडून काही हलकी कामे करून घेतली जातील. ते पर्वतांवर देखील चढू शकतात. त्याचा उद्देश प्राण्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि कामही होते. तज्ज्ञांच्या मते, हे तंत्र प्राण्यांच्या मेंदूला सिग्नल पाठवते. याद्वारे त्यांची हालचाल नियंत्रित केली जाऊ शकते. हे तंत्र प्राण्यांच्या मज्जासंस्थेमध्ये लागू केले जाते, ज्यामध्ये त्यांना कोणतीही समस्या येत नाही. अ‍ॅनिमल सायबॉर्गचा वापर अनेक देशांत आधीच केला जात आहे. चीन, अमेरिका आणि अन्यही अनेक देशांमध्येही याचा मोठा वापर केला जातो.

हेही वाचा : 

Back to top button