औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : लग्नाच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक तरुणांना मुलीच मिळत नसल्याने मुंडावळ्या बांधून जिल्हाधिकारी कार्यालयावर 'आम्हाला बायको मिळवून द्या', अशी मागणी करत काही दिवसांपूर्वी सोलापुरात मोर्चा काढण्यात आला होता. त्यामुळे ग्रामीण भागात सध्या शेतकरी मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाही हा सामाजिक प्रश्न गंभीर बनला आहे.
दरम्यान, आता अशाच एका विवाहेच्छुक तरुणाने मुलगी मिळत नसल्याने चक्क आमदारांनाच फोन लावून, 'तुमच्या मतदारसंघातील मुलगी माझ्यासाठी पाहा', अशी गळ घातली. आमदार आणि या तरुणाच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.
त्याचे असे झाले की, औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड मतदारसंघाचे आमदार उदयसिंह राजपूत यांना खुलताबाद तालुक्यातील एका तरुणाने फोन केला. घरी सर्व काही चांगले आहे. आठ एकर शेतीदेखील आहे. तरीही लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याबद्दल या तरुणाने दु:ख व्यक्त केले. हा तरुण एवढ्यावरच थांबला नाही. तुमच्या भागात माझ्यासाठी मुलगी पाहा, अशी मागणीही त्याने आमदारांकडे केली. यावर राजपूत यांनी त्या तरुणाला नाराज केले नाही. तुझा बायोडाटा पाठवून दे, मी बघतो, असे आश्वासन त्यांनी दिले.