Perseverance : ‘पर्सिव्हरन्स’ रोव्हर फेकत आहे मंगळावरील नमुने! | पुढारी

Perseverance : ‘पर्सिव्हरन्स’ रोव्हर फेकत आहे मंगळावरील नमुने!

वॉशिंग्टन : मंगळ ग्रहावर जीवसृष्टीशी निगडीत पुरावे गोळा करण्यासाठी ‘नासा’ने ‘पर्सिव्हरन्स’ (Perseverance) नावाचे रोव्हर पाठवले आहे. एका प्राचीन नदीच्या कोरड्या पडलेल्या पात्रात हे रोव्हर माती व खडकांचे नमुने गोळा करीत होते. हे सॅम्पलिंगचे काम आता जवळजवळ पूर्ण झालेले आहे. मात्र, त्याचवेळी असे वृत्त आले आहे की हे रोव्हर घेतलेले नमुने मंगळावर फेकत चालले आहे. त्यामुळे अनेकांना वाटू लागले की या रोव्हरमध्ये कोणता बिघाड निर्माण झाला आहे की काय? अर्थातच असे काही नाही. काही सॅम्पल मंगळाच्या पृष्ठभागावर टाकणे हे ‘नासा’च्याच योजनेचा भाग आहे.

रोव्हरने ज्या ज्या दगडावर ड्रील केले तेथून दोन सॅम्पल घेतले होते. ज्या ट्यूब्जना हे रोव्हर टाकत चालले आहे ते बॅकअपसाठी घेतलेले सॅम्पल आहेत. ‘नासा’ची योजना आहे की नऊ वर्षांनंतर म्हणजे 2033 पर्यंत मंगळ ग्रहावरून हे सॅम्पल पृथ्वीवर आणावेत. त्यासाठी ‘नासा’ मंगळावर एक लँडर पाठवणार आहे. मात्र, नऊ वर्षांचा काळ एक दीर्घकाळच असतो. या काळात पर्सिव्हरन्स (Perseverance) रोव्हर खराब झाले किंवा त्याची बॅटरी पूर्णपणे उतरली तर हे सॅम्पल पृथ्वीवर आणणे कठीण होऊन बसेल. त्यावेळी जमिनीवर पडलेले हे सॅम्पलच उपयोगात येऊ शकतात.

‘नासा’ लँडरबरोबरच सॅम्पल रिकव्हरी हेलिकॉप्टरही (Perseverance) पाठवणार आहे. हे हेलिकॉप्टर अशा ट्यूब्जना उचलून त्यांना लँडरमध्ये ठेवील. मंगळावरील धुळीत हे सॅम्पल्स दबून जातील अशीही शंका येऊ शकते. ‘नासा’च्या इनसाईट लँडरला अशाच धुळीमुळे निवृत्त करावे लागले होते. त्याच्या सोलर पॅनेलवर धूळ साचल्याने त्याची बॅटरी चार्ज होऊ शकली नव्हती. मात्र, त्याचाही खुलासा संशोधकांनी केला आहे.

‘नासा’चे म्हणणे आहे की मंगळाचे वातावरण पृथ्वीइतके दाट नाही. तिथेही धूळ उडते; पण इतकी नाही की मातीचा एक जाड थर जमा होईल. ‘नासा’ने क्युरिऑसिटी रोव्हरचे (Perseverance) एक छायाचित्र प्रसिद्ध करून दाखवले आहे की नऊ वर्षांमध्ये किती धूळ साचू शकते. हे रोव्हर 5 ऑगस्ट 2012 मध्ये मंगळावर लँड झाले होते. त्यामुळे या ट्यूब्ज नऊ वर्षांमध्ये अगदीच धुळीत गाडल्या जाणार नाहीत असे ’नासा’ने म्हटले आहे.

Back to top button