Twitter : ट्विटरच्या मुख्यालयातील 265 वस्तूंचा होणार लिलाव | पुढारी

Twitter : ट्विटरच्या मुख्यालयातील 265 वस्तूंचा होणार लिलाव

वॉशिंग्टन : ‘टेस्ला’ आणि ‘स्पेसएक्स’चे सर्वेसर्वा एलन मस्क यांनी ‘ट्विटर’ विकत घेतल्यावर कंपनीमध्ये अनेक प्रकारचे बदल व घडामोडी होत आहेत. आता मस्क नवीन वर्षात ‘ट्विटर’ मुख्यालयात वापरल्या जाणार्‍या 265 वस्तू विकणार आहेत. हा लिलाव 17 जानेवारीला ऑनलाईन होणार आहे. (Twitter)

लिलावात मुख्यालयातील किचनमधील उपकरणे, इलेक्ट्रॉनिक्स, फर्निचर यासह अनेक संस्मरणीय वस्तू लिलावासाठी ठेवण्यात आल्या आहेत. ऑनलाईन बोली 17 ते 18 जानेवारी या कालावधीत चालणार आहे. बर्‍याच वस्तूंसाठी प्रारंभिक किंमत 25 ते 50 डॉलर्स ठेवली आहे. (Twitter)

लिलावासाठी असलेल्या वस्तूंमध्ये दोन व्यायाम बाईक, एक एस्प्रेसो मशिन आणि गुगल 55-इंच डिजिटल व्हाईट बोर्ड डिस्प्ले, डझनभर खुर्च्या तसेच कॉफी मशिन यांचा समावेश आहे. लिलाव पाहणार्‍या हेरिटेज ग्लोबल पार्टनर्सचे निक डोव्ह यांनी सांगितले की, या लिलावाचा ट्विटरच्या आर्थिक स्थितीशी काहीही संबंध नाही. जो कोणी असा विचार करतो तो मुर्ख आहे. कंपनी ताब्यात घेतल्यानंतर मस्क यांचे दररोज 32 कोटींचे नुकसान होत असल्याचे नुकतेच समोर आले आहे.

मस्कने ट्विटर 44 अब्ज डॉलर्समध्ये विकत घेतले. त्याचीही लवकरच भरपाई करायची आहे. ट्विटरवर खूप कर्ज आहे. ते भरून काढण्यासाठी जाहिरातींवर अवलंबून राहू इच्छित नाही, म्हणून त्यांना सदस्यता मॉडेलद्वारे महसूल वाढवायचा आहे. हे नुकसान भरून काढण्याच्या द़ृष्टीनेही मुख्यालयातील मालमत्तांच्या लिलावाकडे पाहिले जात आहे.

हेही वाचा; 

Back to top button