वृद्ध लोकांची देखभाल करणारा रोबो | पुढारी

वृद्ध लोकांची देखभाल करणारा रोबो

लंडन : ह्युमनाईड रोबो म्हणजेच मानवाकृती रोबोंचा हल्ली अनेक क्षेत्रात वापर केला जात आहे. आता असा रोबो वयोवृद्ध लोकांचा सोबतीही बनणार आहे. ब्रिटनची रोबोटिक्स कंपनी ‘इंजिनियर्ड आर्टस्’ने एक असा मानवाकृती रोबो विकसित केला आहे जो बोलू शकतो आणि काही घरगुती कामेही करू शकतो. हा रोबो एकटे राहणार्‍या वृद्ध लोकांना सोबत देऊ शकतो तसेच त्यांना दैनंदिन कामामध्ये मदतही करू शकतो.

कंपनीचे मालक जॅक्सन यांनी सांगितले की या रोबोंच्या डोळ्यात कॅमेरा बसवलेला आहे. आम्ही त्यांना अ‍ॅनिमेशनच्या माध्यमातून मानवी चेहरा देण्याचा प्रयत्न करीत आहोत जो वेगवेगळ्या भावना व्यक्त करू शकेल. हा रोबो स्त्रीरूपात असेल. तिला ‘अमेका’ असे नाव देण्यात आले आहे. अमेका सध्या चालू शकत नाही; पण तिच्यासाठी पाय तयार करण्याचे काम सुरू आहे. ती वेगवेगळ्या लोकांशी बोलू शकते, चांगला संवाद साधू शकते. विशेषतः वृद्ध लोकांची ती चांगली सोबती बनू शकते. त्यांना त्यांच्या गरजेच्या गोष्टींची आठवणही करून देऊ शकते. तसेच त्यांचा आवडता टी.व्ही. कार्यक्रम येणार असेल तर त्याचीही आठवण देऊ शकते.

वृद्ध लोकांना ती बुद्धीबळासारखे खेळ शिकवू शकते. जगभर सध्या अशा रोबोंची निर्मिती केली जात आहे. ‘टेस्ला’व ‘स्पेसएक्स’चे सर्वेसर्वा एलन मस्क यांनीही 30 सप्टेंबरला ऑप्टिमस रोबोचे अनावरण केले होते. हा रोबोही चालू शकतो; पण चाकांवर. मस्क यांनी म्हटले होते की मोठ्या प्रमाणात अशा रोबोंची निर्मिती सुरू झाल्यावर त्यांची किंमत 16 लाख रुपयांपर्यंत घटू शकते. जपानमध्येही मानवी चेहरा असलेले व बोलू शकणारे रोबो बनवण्यात आले आहेत.

Back to top button