50 हजार वर्षांपूर्वीच्या निएंडरथल कुटुंबाचा जीनोम | पुढारी

50 हजार वर्षांपूर्वीच्या निएंडरथल कुटुंबाचा जीनोम

मॉस्को : रशियाच्या सैबेरियातील बर्फाच्छादीत अल्ताई पर्वतात असलेल्या एका गुहेत प्राचीन काळातील मानवांची हाडे व दात सापडले होते. या गुहेत 50 हजार वर्षांपूर्वी राहणार्‍या कुटुंबाचे हे अवशेष होते. या शिकारी कुटुंबातील प्रौढ व लहान मुलांच्या हाडांवरून त्यांच्या जीनोम्सचा एक पूर्ण संच मिळवण्यात आता संशोधकांना यश आले आहे.

होमो सेपियन्सप्रमाणेच निएंडरथल ही एक वेगळी मानव प्रजाती होती जी काळाच्या ओघात नष्ट झाली. रशियाच्याच डेनिसोवा गुहेतही ‘डेनिसोवन’ नावाच्या वेगळ्या मानव प्रजातीचा शोध लागला होता. या गुहेपासून शंभर किलोमीटरवर असलेल्या गुहेत या निएंडरथल कुटुंबाचे अवशेष सापडलेले आहेत. या गुहेचे नाव आहे ‘चागिर्स्काया’. 2019 मध्ये या गुहेत तब्बल 90 हजार दगडी अवजारे, हाडांची साधने तसेच प्राणी व वनस्पतींचेही प्राचीन अवशेष सापडले होते. त्याबरोबरच निएंडरथल मानवांची 74 जीवाश्मेही आढळली होती.

त्यांच्या रेडिओकार्बन चाचणीनंतर असे दिसून आले की हे अवशेष 51 हजार ते 59 हजार वर्षांदरम्यानच्या काळातील आहेत. ते ज्या काळात राहत होते त्यावेळी तेथील हवामान थंड होते असेही दिसून आले. ‘नेचर’ या नियतकालिकात याठिकाणी सापडलेल्या अवशेषांच्या डीएनए विश्लेषणाची माहिती देण्यात आली आहे. चागिर्स्काया आणि जवळच्या ओक्लाडनिकोव्ह नावाच्या गुहेतील अवशेषांमधून हे डीएनए नमुने घेण्यात आले होते. त्यामधून 13 जीनोम्स मिळवण्यात आले.

Back to top button