युक्रेनियन पुरुषांना वाटते भोपळ्याची भीती | पुढारी

युक्रेनियन पुरुषांना वाटते भोपळ्याची भीती

नवी दिल्ली : पृथ्वीवर जितके देश आहेत, तितक्या जास्त परंपरा आहेत. प्रत्येक देशात शतकानुशतके असंख्य परंपरा चालत आल्या असून त्या आजही तितक्याच गांभीर्याने पाळल्या जातात. प्रत्येक देशात विवाहासंबंधी रीतिरिवाज वेगवेगळे आहेत. अन्य देशांहून एक अत्यंत वेगळा रिवाज सध्या युद्धात होरपळत असलेल्या युक्रेनमध्ये पाळला जातो. या देशातील वधूला जर वर पसंत नसेल, तर त्याला ती भोपळा भेट देते. यामुळेच या देशात विवाहेच्छुक तरुणांना भोपळ्याची भीती वाटत असते.

लँटहॉर्न वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार ‘हॅलोविन’ सणादरम्यान अमेरिकेत मोठ्या प्रमाणात भोपळ्याचा वापर केला जातो. हाच भोपळा युक्रेनमध्ये विवाहासंदर्भात उपयोगात आणला जातो. मात्र, या देशातील तरुणांना भोपळ्याची फारच भीती वाटत असते.

या देशातील रिवाजानुसार एखादा विवाहेच्छुक तरुण विवाहाचा प्रस्ताव घेऊन एखाद्या तरुणीच्या घरी जातो, तेव्हा विवाहासाठी त्या तरुणीबरोबरच तिच्या आई-वडिलानांही त्याला मनवावे लागते, तरीही अंतिम निर्णय तरुणीवरच अवलंबून असतो. तरुणी विवाहासाठी तयार झाली, तर तरुणाच्या हाती रिबन बांधते; मात्र तिला विवाह मान्य नसेल, तर ती तरुणाच्या हाती भोपळा ठेवते. भोपळा देणे म्हणजे विवाहाला नकार असा पूर्व युरोपमध्ये वर्षानुवर्षे समज आहे. याबरोबरच युक्रेनमध्ये एखाद्या नेत्याला विरोध करावयाचे असेल, तरीही त्याला भोपळा दाखविला जातो.

Back to top button