‘या’ देशात नाहीत डास | पुढारी

‘या’ देशात नाहीत डास

रेझविक : जगभरात दरवर्षी सुमारे 10 लाखांहून अधिक लोकांचा डासांनी चावल्याने होणार्‍या आजारांमुळे मृत्यू होतो. जगात डासांच्या तीन हजारांहून अधिक प्रजाती आहेत. अन्य प्राण्यांच्या तुलनेत डासांमुळे सर्वात जास्त संख्येने आजार पसरतात.

जगातील प्रत्येक देशात डास सापडतात. मात्र, असा एक देश आहे की तेथे डास शोधूनही सापडत नाहीत. ‘आईसलँड’ असे या देशाचे नाव! हा एक असा देश आहे की, तेथे डास, साप अथवा अन्य सरपटणारे जीव सापडत नाहीत. याशिवाय येथे कोळी सापडत असले तरी त्यांचा माणसाला धोका संभवत नाही. आईसलँडशिवाय उत्तर अटलांटिक येथेही डास सापडत नाहीत.

आईसलँडमधील तापमान अत्यंत कमी असते. इतक्या तापमानात डास जिवंतच राहू शकत नाहीत. ‘आईसलँड वेब ऑफ सायन्स’ने दिलेल्या माहितीनुसार आईसलँडमध्ये बिलकुल डास सापडत नाहीत. मात्र, शेजारील देशात ते मोठ्या संख्येने सापडतात.

आईसलँडमधील हवामान प्रचंड वेगाने बदलत असते. यामुळे ठराविक वेळेत डास आपले जीवनचक्र पूर्ण करू शकत नाहीत. ज्यावेळी तापमान घटते, त्यावेळी प्रचंड प्रमाणात हिमपात होत असतो. अशा स्थितीत डासांचा लार्व्हा विकसित होऊच शकत नाही. यामुळे या देशात डासांचा जन्मच होऊ शकत नाही.

आईसलँडमध्ये उणे 38 अंश सेल्सिअसपर्यंत पारा घसरतो. यामुळे पाण्याचे बर्फात रूपांतर होते. एखाद्या डासाचा लार्व्हा असला तरी तो बर्फात विकसित होऊ शकत नाही. म्हणजेच प्रजननही शक्य होऊ शकत नाही.

Back to top button