KKR vs PBKS : ५२३ धावा… ४२ षटकार, १ सामना अन् ५ विक्रम; कोलकाता-पंजाब सामन्यानं रचला इतिहास | पुढारी

KKR vs PBKS : ५२३ धावा... ४२ षटकार, १ सामना अन् ५ विक्रम; कोलकाता-पंजाब सामन्यानं रचला इतिहास

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात शुक्रवारी (दि.२६) ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या IPL 2024 च्या ४२ व्या सामन्यात इतिहास रचला गेला. दोन्ही संघांनी सामन्यात ४२ षटकार ठोकले, जे पुरुषांच्या टी २० सामन्यातील सर्वोच्च आहे. त्याचबरोबर २६२ धावांचा पाठलाग करून पंजाबने टी-२० क्रिकेटमधील सर्वात मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करण्याचा जुना विक्रम मोडीत काढला.

पंजाब किंग्सने टी २० क्रिकेट आणि लीगच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्येचा पाठलाग केला. कोलकाता नाईट रायडर्सने २६२ धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे पंजाबने आठ चेंडू बाकी असताना पूर्ण केले. २६२ धावांचा पाठलाग करून पंजाबने टी-२० क्रिकेटमधील वर्षानुवर्षे जुना विक्रम मोडीत काढला. गेल्या वर्षी सेंच्युरियनमध्ये दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजसमोर २५९ धावांचे आव्हान ठेवले होते. त्याचबरोबर पंजाबने आयपीएलमधील सर्वात मोठा धावांचा पाठलाग करण्याचा चार वर्षे जुना विक्रमही मोडीत काढला. २०२० मध्ये, राजस्थानने शारजाहमध्ये पंजाबविरुद्ध २२४ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता.

या सामन्यात एकूण ५२३ धावा झाल्या, ज्या कोणत्याही आयपीएल सामन्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या (एकत्रित) धावा आहेत. याच हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चिन्नास्वामी येथे झालेल्या सामन्यात दोन्ही डावात ५४९ धावा केल्या होत्या, ज्या सर्वाधिक होत्या. त्याचवेळी याच हंगामात सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात दोन्ही डावांत मिळून ५२३ धावा झाल्या होत्या.

या सामन्यात पंजाबने २४ षटकार ठोकले, जे आयपीएल सामन्याच्या एका डावात कोणत्याही संघाने मारलेले सर्वाधिक षटकार आहेत. यापूर्वी याच मोसमात सनरायझर्सने बेंगळुरूविरुद्ध २२ षटकार ठोकले होते. त्याचवेळी टी-२० क्रिकेटमध्ये एकाच डावात मारण्यात आलेले हे दुसरे सर्वाधिक षटकार आहेत. पंजाबपेक्षा फक्त नेपाळचा संघ पुढे आहे. २०२३ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने मंगोलियाविरुद्ध २६ षटकार मारले होते.

हेही वाचा : 

Back to top button