नॅनो प्लास्टिकचा छडा लावण्यासाठी नवे तंत्रज्ञान | पुढारी

नॅनो प्लास्टिकचा छडा लावण्यासाठी नवे तंत्रज्ञान

नवी दिल्ली ः आपल्या केसांच्या जाडीपेक्षा हजार पटीने सूक्ष्म अशा नॅनो प्लास्टिक कणांमुळे पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे. आयआयटी बॉम्बे आणि दक्षिण आफ्रिकेच्या मँगोसुथू तंत्रज्ञान विद्यापीठाच्या संशोधकांनी अशा सूक्ष्म प्रदूषकांचा छडा लावण्यासाठी एक नवे तंत्र विकसित केले आहे. नैसर्गिक घटकांना नष्ट होऊ न देताच अशा प्लास्टिक कणांची ओळख करण्यात हे तंत्र प्रभावी असल्याचे दिसून आले आहे.

आयआयटी बॉम्बेचे प्राध्यापक टी.आय. एल्धो यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेच्या मँगोसुथू तंत्रज्ञान विद्यापीठाचे संशोधक डॉ. अनिल लोनाप्पन यांच्या सहकार्याने हे संशोधन झाले. मायक्रोवेव्हच्या आत ठेवल्यावर एखाद्या सामग्रीच्या विद्युतीय गुणांमध्ये होणार्‍या परिवर्तनावर आधारित हे संशोधन आहे. पर्यावरणातील नमुन्यांमधील प्रदूषकांचा छडा लावण्यासाठी हँडहेल्ड डिव्हाईस विकसित करण्यासाठी हे संशोधन उपयुक्त ठरू शकते. ‘जर्नल ऑफ हॅझार्डस मटेरियल्स’ या नियतकालिकात संबंधित संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. सध्या असे सूक्ष्म प्लास्टिक कण सर्वत्र आढळून येत आहेत. अगदी महासागरांपासून ते अंटार्क्टिकासारख्या निर्जन ठिकाणापर्यंत आणि मानवी शरीरातही हे कण आढळले आहेत. अशा कणांपासून निर्माण होणारा धोका व्यापक असल्याने आयआयटी बॉम्बेच्या टीमने या प्लास्टिक कणांचा छडा लावण्यासाठी मायक्रोवेव्ह विकिरणांचा वापर
केला.

Back to top button