‘ही’ ट्रेन बोगद्यात गेली आणि गायबच झाली! | पुढारी

‘ही’ ट्रेन बोगद्यात गेली आणि गायबच झाली!

रोम : काही काही घटना व स्थळे लोकांसाठी गूढच बनून राहत असतात. बर्म्युडा ट्रँगलमध्ये गायब झालेली जहाजे व विमाने अशीच गूढ बनून राहिलेली आहेत. एका इटालियन ट्रेनबाबतही अशीच घटना घडली होती. ही घटना 1911 मधील आहे. त्यावेळी एकूण 106 प्रवाशांना घेऊन जाणारी ट्रेन बोगद्यात प्रवेश करताच अचानक गायब झाली! ही ट्रेन कुठे गेली हे आजपर्यंत कुणालाही समजू शकलेले नाही!

या ट्रेनबद्दल असे सांगितले जाते की ‘झानेट्टी’ नावाची ही ट्रेन 1911 मध्ये रोम स्टेशनमधून बाहेर पडली होती. दरम्यान, ट्रेन एका बोगद्यातून जाणार होती. ही ट्रेन बोगद्याच्या आत तर गेली; पण ती तेथून बाहेर आली नाही. या घटनेनंतर तिचा बराच शोध घेण्यात आला, पण काहीही गवसले नाही. त्यामुळे अर्थातच ही ट्रेन एक गूढच बनून राहिली. या ट्रेनबद्दल असेही सांगितले जाते की त्यामधील दोन प्रवासी नंतर सापडले होते व त्यांनी या ट्रेनबाबत धक्कादायक खुलासा केला होता.

या प्रवाशांनी सांगितले की अचानक खूप धूर येऊ लागला आणि काहीही दिसणं बंद झालं होतं. त्यामुळे त्यांनी घाबरून ट्रेनमधून उडी ठोकली व त्यांचे प्राण वाचले. त्यानंतर ही ट्रेन बोगद्यात घुसली व ती सापडलीच नाही. या ट्रेनबाबत आणखीही काही गोष्टी सांगितल्या जातात. ही ट्रेन काळाच्या 71 वर्षे मागे गेली आणि 1840 सालातील मेक्सिकोत पोहोचली असेही सांगितले जाते.

मेक्सिकोतील एका डॉक्टरनेही दावा केला होता की तो काम करीत असलेल्या 104 रुग्णांना रहस्यमयरीत्या दाखल करण्यात आले होते. हे सर्वांना वेड लागले होते व ते रेल्वेतून आले होते. मात्र, आश्चर्याची गोष्ट म्हणजे युरोप खंडात असलेल्या इटलीतून अमेरिका खंडात असलेल्या मेक्सिकोपर्यंत त्या काळात हे लोक रेल्वेतून कसे गेले असतील? मधला महासागर त्यांनी कसा पार केला? हे सर्व प्रश्न अनुत्तरीतच आहेत! ही ट्रेन जर्मनी, रोमानिया आणि रशियाच्या भागातही पाहिल्याचे दावे झाले.

Back to top button