1220 दिवसांनी ‘तो’ व्हीलचेअरवरून राहिला उभा! | पुढारी

1220 दिवसांनी ‘तो’ व्हीलचेअरवरून राहिला उभा!

लंडन :

एखाद्या दीर्घ आजारातून बरे होऊन उठणे म्हणजे जणू काही पुनर्जन्मच असतो. त्यासाठी योग्य वैद्यकीय उपचारांबरोबरच रुग्णाच्या प्रबळ इच्छाशक्‍तीचीही गरज असते. आजारातून बाहेर पडण्यासाठी शारीरिक ताकतच नव्हे तर मानसिक बळही गरजेचे आहे. अशाच एका रुग्णाने तब्बल 1220 दिवस व्हीलचेअरवर घालवल्यानंतर आता तो स्वतःच्या पायावर उठून उभा राहिला आणि त्यालाही आपला हा पुनर्जन्मच झाला असल्याचे वाटले!

रॉबर्ट पायलोर असे या माणसाचे नाव. आपल्या या आनंदी क्षणांचा व्हिडीओ त्याने शेअर केला आहे. त्यामध्ये तो व्हीलचेअरवरून उठून चालण्याचा प्रयत्न करीत असताना दिसतो. त्याने म्हटले आहे, मी आज पहिल्यांदा कुणाच्याही मदतीशिवाय माझ्या व्हीलचेअरवरून उठून चालण्याचा प्रयत्न केला. यासाठी मला 1220 दिवस लागले. मात्र, मी इतके दिवस केलेल्या मेहनतीचे हे सुंदर फळ आहे. सध्या हा व्हिडीओ ट्विटरवरून मोठ्या प्रमाणात ट्रेंड होत असून आतापर्यंत 2.8 दशलक्ष लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तसेच सुमारे 1 लाख 75 हजार लोकांनी तो लाईक केला आहे. 18 हजार लोकांनी तो रिट्विटही केला आहे. अनेकांनी या निमित्ताने आपलेही अनुभव शेअर केले आहेत.

Back to top button