‘आयआयटी’ तरुणी नोकरी सोडून बनली शेतकरी! | पुढारी

‘आयआयटी’ तरुणी नोकरी सोडून बनली शेतकरी!

भुवनेश्‍वर : आयआयटी पासआऊट पूजा भारतीने ‘गॅस अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड’मधील शानदार नोकरी सोडून गावात शेती करण्याचे ठरवले. ती मूळची बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील बिहारशरीफची. आता तिने ओडिशात सेंद्रिय शेती सुरू केली असून त्या माध्यमातून तिने अनेक शेतकर्‍यांना मदत केली आहे. स्वतः 22 लाखांची नोकरी सोडून शेतकरी बनलेल्या पूजामुळे शेतकर्‍यांना महिन्याकाठी वीस हजार रुपयांची कमाई होत आहे.

2009 मध्ये पूजाने केमिकल इंजिनिअरिंगची पदवी घेऊन ‘गेल’मध्ये नोकरी सुरू केली. पूजाच्या कुटुंबाचे गावात मोठे घर, शेती व बाग-बगीचे होते. शहरातील नोकरीने पैसा मिळाला; पण गावातील शांत वातावरण, शेतातील सुखद वावर यांना ती मुकली. पूजाचाच बॅचमेट असलेल्या मनीष याने आयआयटी पासआऊट झाल्यानंतर नोकरी करण्याऐवजी बिहारमध्ये परत येऊन शेतीशी निगडीत स्टार्टअप सुरू केले होते. मनीषपासून प्रेरणा घेऊन पूजानेही आपली नोकरी सोडून ऑर्गेनिक फार्मिंग सुरू करण्याचे ठरवले. 2015 मध्ये तिने नोकरी सोडली आणि एक वर्षभर तिने सेंद्रिय शेतीबाबतची दीपक सचदे यांच्याकडून माहिती घेतली. मनीषच्या मदतीने तिने 2016 मध्ये ‘बॅक टू व्हिलेज’कंपनीची सुरुवात केली. या माध्यमातून सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याबरोबरच ग्रामीण जीवनशैलीत सुधारणा घडवून आणण्याचे कामही तिने सुरू केले. खेड्यात जाऊन तिथे रोजगाराच्या संधी निर्माण करणे हे तिचे ध्येय होते. तिची कंपनी सध्या गावांमध्ये प्रगत कृषी केंद्रे चालवत आहे. ओडिशामध्ये तिच्या कंपनीची दहा केंद्रे आहेत. सेंद्रिय शेतीने कमी खर्चात अधिक पीक उत्पादन कसे घ्यायचे याचे शिक्षण ती शेतकर्‍यांना देते.

Back to top button