Planets : तीन बाह्यग्रहांनी गमावला ग्रहाचा दर्जा | पुढारी

Planets : तीन बाह्यग्रहांनी गमावला ग्रहाचा दर्जा

न्यूयॉर्क : आपल्या सूर्यमालेबाहेर असलेल्या तीन खगोलिय पिंडांची ‘बाह्यग्रह’ म्हणून पुष्टी करण्यात आली होती. मात्र, आता ते बाह्यग्रह नाहीत, असे एका संशोधनातून स्पष्ट करण्यात आले आहे. या यादीत आणखी एका पिंडाचाही समावेश असून त्याबाबत अद्याप संशोधन सुरू आहे.

नव्या संशोधनातील निष्कर्षानुसार केप्लर 854 बी, केप्लर 840 बी आणि केप्लर 669 हे खगोलिय पिंड आकाराने इतके मोठे आहेत, ते निश्‍चितपणे तारे असू शकतात. चौथा पिंड केप्लर 747 बी हा सुद्धा अशाच प्रकारचा तारा असू शकतो. मात्र, त्याच्या संदर्भात अधिक माहिती मिळणे बाकी आहे. ‘मॅसाच्युसेटस् इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या कॉवले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अंतराळ संशोधक अवी शूपरर यांच्या मते, हे नवे संशोधन ग्रहांची यादी आणखी चांगली बनवते. आतापर्यंत पाच हजारांहून अधिक बाह्यग्रहांचा शोध लावण्यात आला आहे. मात्र, तीन बाह्यग्रहांनी ग्रहाचा दर्जा गमावल्याने ही संख्या घटू शकते.

दरम्यान, बाह्यग्रहासंंबंधीच्या या संशोधनाचे नेतृत्व करणार्‍या एमआयटीचे खगोलशास्त्रज्ञ प्रज्ज्वल निरौला यांनी सांगितले की, बहुतेक बाह्यग्रह हे गुरूच्या आकाराचे असतात. अथवा गुरुपेक्षा लहानही असू शकतात; मात्र गुुरूपेक्षा दुप्पट मोठ्या असलेल्या खगोलपिंडाबाबत संभ्रमावस्था निर्माण होते. कारण, हे पिंड बाह्यग्रह असू शकत नाहीत. प्रसंगी ते तारे असू शकतात.

हेही वाचलत का ?

Back to top button