लंडन : जगभरात असे कित्येक लोक आहेत की, पाळीव प्राणी हे त्यांच्या कुटुंबाचे एक अविभाज्य घटकच असतात. या पाळीव जीवांच्या देखभालीवर ते हजारो रुपये खर्च करण्यास मागे-पुढे पाहत नाहीत. यामध्ये डॉगीसह अनेक प्राण्यांचा, पक्षांचा समावेश करावे लागेल. मात्र, पाळीव किड्याबद्दल कधी ऐकला आहे का, ज्याची किंमत लाखोंच्या घरात आहे. या किड्याला जगातील सर्वात महागडा किडा म्हणून ओळखले जाते.
या महागड्या किड्याला 'स्टॅग बिटल' या नावाने ओळखले जाते. गेल्या काही वर्षांपूर्वी एका जपानी ब्रीडरने स्टॅग बिटलला पाळले होते. शेवटी त्याने या किड्याला 89,000 डॉलर्स म्हणजे आजच्या हिशेबाने 65 लाख रुपयांना विकले होते. आता हा किडा लुकानिडे कुटुंबाचा एक सदस्य आहे. तसे पाहिल्यास जगात या किड्याच्या एक हजाराहून अधिक प्रजाती अस्तित्वात आहेत. मात्र, अवघा दोन ते तीन इंच लांब असणारा हा स्टॅग बिटल एक अत्यंत दुर्मीळ किडा आहे.
'स्टॅग बिटल' हा दिसावयास काहीसा खेकड्यासारखा दिसतो. चमकदार काळ्या शिंगामुळे या किड्याची ओळख पटते. दुर्मीळ असलेला हा किडा अत्यंत महागडाही आहे. कारण, स्टॅग बिटलचा उपयोग करून अनेक प्रकारची औषधे तयार केली जातात. यामुळेच तो इतका महागडा आहे. स्टॅग बिटल हा आपले बहुतेक जीवन जमिनीखालीच व्यतीत करत असतो. त्याची पिले कुजत असणारी लाकडे खातात, तर वयस्क स्टॅग बिटल झाडांचा रस, फळांचा रस आणि पाण्यावर जिवंत असतात.