रशियन अंतराळवीरांचे पोशाखातून युक्रेनला समर्थन? | पुढारी

रशियन अंतराळवीरांचे पोशाखातून युक्रेनला समर्थन?

वॉशिंग्टन : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अद्याप सुरूच आहे. रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनला अगदी रशियातीलही अनेकांनी समर्थन दिले. या पार्श्वभूमीवर आता रशियन अंतराळवीरही युक्रेनचे समर्थन करीत असताना दिसून आले. हे सर्व अंतराळवीर युक्रेनच्या ध्वजाशी मिळत्या-जुळत्या रंगाचे पोशाख परिधान करून पृथ्वीच्या कक्षेत फिरत असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले.

सोयूज कॅप्सूल कमांडर ओलेग आर्टेमयेव, डेनिस मतवेव आणि सर्गेई कोर्साकोव हे तिघेजण आता अंतराळ स्थानकावर पोहोचले आहेत. यान लाँच झाल्यानंतर तीन तासांनी ते प्लॅटफॉर्मवर पोहोचले होते. त्यावेळी या सर्वांनी पिवळ्या व निळ्या रंगाचे पोशाख परिधान केले होते. युक्रेनचा झेंडाही अशाच रंगांचा आहे हे विशेष! रशिया आणि अमेरिकेमधील तणाव काही नवा नाही.

सध्या तर रशिया-युक्रेन युद्धामुळे तो अधिकच वाढलेला आहे. मात्र, तरीही गेल्या वीस वर्षांपासून या दोन्ही देशांची भागीदारी असलेल्या अंतराळ स्थानकाचे काम सुरळीत सुरू आहे. तिन्ही अंतराळवीर स्थानकावर पोहोचल्यावर रशियाच्या मिशन कंट्रोलरकडून टीमचे अभिनंदन करण्यात आले. स्थानकावर सध्या असलेले अंतराळवीर प्योत्र डबरोव, अँटोन श्काप्लेरोव आणि अमेरिकन अंतराळवीर मार्क वंदे यांची जागा हे तिघेजण घेणार आहेत. सध्याची टीम 30 मार्चला पृथ्वीवर परत येईल.

Back to top button