निव्वळ वायूचे गोळे असलेले चंद्रही आहेत? | पुढारी

निव्वळ वायूचे गोळे असलेले चंद्रही आहेत?

न्यूयॉर्क :  आपल्या ग्रहमालिकेत दोन प्रकारचे ग्रह आहेत. पहिल्या प्रकारातील ग्रहांचा पृष्ठभाग कठीण, खडकाळ आहे तर दुसर्‍या प्रकारातील ग्रह म्हणजे निव्वळ वायूचे गोळे आहेत. मात्र, या दोन्ही प्रकारच्या ग्रहांचे चंद्र ठोस, खडकाळ पृष्ठभागाचेच आहेत. त्यामुळे असा प्रश्न निर्माण होतो की ग्रहांप्रमाणे त्यांचे उपग्रह म्हणजेच चंद्रही वायूचे गोळे असू शकतात का? बह्मांडात असे चंद्र आहेत का?

कॉर्नेल युनिव्हर्सिटीच्या डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅस्ट्रॉनॉमीचे विभागप्रमुख जॉनथन लुनिन यांनी सांगितले की अंतराळात आपल्या ग्रहमालिकेच्या शेजारी असलेल्या कोणत्याही ग्रहाला असा वायूचा गोळा असलेला चंद्र नाही. यामागे काही विशिष्ट अशी कारणे आहेत. त्यामध्ये संबंधित चंद्राचे वस्तुमान, त्याच्या आजुबाजूचे तापमान आणि त्याच्यावरील जवळच्या ग्रहाच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा प्रभाव यांचा समावेश होतो.

जर असे चंद्र वायूचे गोळे असतील तर काय होईल याची आपण कल्पना करू शकतो. समजा आपल्याच पृथ्वीचा चंद्र असा वायूचा गोळा असता तर? त्याच्या खडकाळ, ठोस पृष्ठभागाऐवजी तिथे शुद्ध हायड्रोजन वायू असता तर काय झाले असते याची कल्पना करा. हायड्रोजन वायू हा दगडापेक्षा कमी घनतेचा असतो. त्यामुळे चंद्राचा आकार वाढून तो आपल्या पृथ्वीइतका झाला असता! आपल्या ग्रहमालिकेतील सर्वात मोठा ग्रह म्हणजे गुरू. हा ग्रह म्हणजे निव्वळ वायूचा गोळा असून त्याचा इतका मोठा आकार असण्याचे हेच कारण आहे. या बाबतीत केवळ आकारच नव्हे तर तापमानाचा विषयही महत्त्वाचा आहे.चंद्र जर वायूचा असता तर तापमानाबाबतही भलतेच पेचप्रसंग तयार झाले असते.

Back to top button