विशेष मुलाखत : अपेक्षा पूर्ण करणारे एकमेव नेतृत्व मोदीजी : फडणवीस | पुढारी

विशेष मुलाखत : अपेक्षा पूर्ण करणारे एकमेव नेतृत्व मोदीजी : फडणवीस

जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्याची क्षमता असणारे द्रष्टे एकमेव नेतृत्व म्हणून देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहतो. त्यांना पुन्हा पंतप्रधान करण्याचे जनमत आहे. त्यासाठी देश पुन्हा मोदीजींसोबत जाणार आहे आणि यापूर्वीपेक्षा अधिक जागा देणार आहे. महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असा विश्वास भारतीय जनता पक्ष, महायुतीचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘पुढारी न्यूज चॅनल’चे कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केला.

  • आम्ही लोकांना सांभाळणारे आहोत. लोक आमच्यासोबत आहेत. लोकांना वापरून फेकणार्‍यांपैकी आम्ही नाही. डावाला प्रतिडाव खेळावाच लागतो.
  • हर्षवर्धन पाटील, विजय शिवतारे यांची आम्ही समजूत काढली. दोघेही नेते नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी पूर्ण ताकदीने आमच्यासोबत आहेत.

प्रश्न ः वातावरणातील तापमान वाढतं तसं राजकीय तापमानही वाढत आहे. या झंझावातात निवडणूक पुढे जात आहे. चार जूनला निवडणूक निकालादिवशी नेमकं चित्र काय असेल?
फडणवीस ः देश मोदीजींसोबत जाणार, हा निर्णय देशाने घेतला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत लोकांच्या आशा, अपेक्षा आणि आकांक्षा या देशाच्या नेत्यांकडून असतात. त्या पूर्ण करू शकेल असे एकमेव नेतृत्व मोदीजींच्या नेतृत्वात जनतेला दिसत आहे. दहा वर्षांत त्यांनी नि:स्वार्थीपणे केलेले कार्य लोकांनी पाहिले. झालेला विकास पाहिला. बदललेला भारत पाहिला. त्यामुळे चार जूनला जनता मोदीजींना यापूर्वीपेक्षा जास्त जागा देणार आहे.
प्रश्न ः हा तुमचा आत्मविश्वास आहे तर एकाचे दोन, दोनाचे तीन पुन्हा मनसे आणि जानकर यांना सोबत का घेतले? विरोधकांकडून याबाबत आरोप होतो. आत्मविश्वास एवढा आहे तर याची गरज काय?
फडणवीस ः आत्मविश्वास असावा पण अतिआत्मविश्वास नसावा. निवडणूक निवडणुकीसारखी लढायची असते. शक्तीचा संचय करून वस्तुस्थितीचे भान ठेवायचे. महाराष्ट्रातील वस्तुस्थिती अशी आहे, की तीन पक्ष आमच्या विरोधात होते. सुदैवाने आणि त्यांच्या दुर्दैवाने त्यातील दोन पक्ष हे आमच्यासोबत आले. त्यातला उरलेला भाग तिकडे राहिला. त्यामुळे तिकडेही तीन पक्ष आहेत आणि इकडेही तीन पक्ष आहेत. जानकर पूर्वीपासून आमच्यासोबत आहेत. राज ठाकरे 2014 साली आमच्यासोबत होते. 2019 ला त्यांच्यासोबत होते. निवडणुकीत जेवढी शक्ती वाढविता येईल, तेवढी वाढविली पाहिजे.
प्रश्न ः शरद पवार यांनी ओढूनही महादेव जानकर महाविकासकडे जाता जाता इकडे आले. मात्र, यावेळी त्या प्रत्येक डावाला प्रतिडाव खेळताना एका चाणक्याचा उदय होतो. यावेळी त्यांनी टाकलेले डाव चितपट होत आहेत. हे कसं घडतंय. यामागचे सिक्रेट काय?
फडणवीस ः शरद पवार गेली पन्नास वर्षे महाराष्ट्रात राजकारण करत आहेत. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र माहिती आहे. त्यांना स्वतःची शक्तीही माहिती आहे. पण त्याचवेळी दुसर्‍याची शक्ती कमी करण्याकरिता काय करता येईल आणि आपली शक्ती वाढविण्याची क्षमता जेव्हा संपते, तेव्हा दुसर्‍याची शक्ती कमी कशी करता येईल, याची हातोटी त्यांच्याकडे आहे. मात्र, त्यांच्याशी संघर्ष करता करता आणि त्यांच्याशी लढता लढता काही गोष्टी आम्हालाही समजल्या. आम्ही शिकलो. आम्हालाही तसाच महाराष्ट्र माहिती आहे. माणसं माहिती आहेत. कोण जोडली पाहिजेत, हे माहिती आहे. लोकांना वापरून फेकणार्‍यांपैकी आम्ही नाही. हे आमचे रेप्युटेशन आहे. आम्ही लोकांना सांभाळणारे आहोत. यामुळेच लोक आमच्यासोबत येतात. डावाला प्रतिडाव हा खेळावाच लागतो.
प्रश्न ः बारामती म्हणजे मिशन इम्पॉसिबल. पण गेल्यावेळी हे ध्येय तुम्ही साध्य करीत आणले होते. लोकांना असा प्रश्न पडतो की जिथं शेवटचा टप्पा गाठायचा होता, जिथं कमळ फुललं असतं. पाच लाख मतांपर्यंत टप्पा गाठला. पण पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार लढतीत जिंकतील पण पवारच आणि हरतील पण पवारच.
फडणवीस ः तुमचं म्हणणं खरं आहे. 2014 व 2019 ला या ठिकाणी जी धडक आम्ही मारली ती धडकी भरविणारी होती. प्रचंड प्रतिसाद तेथे आम्हाला मिळाला. गेल्या पाच वर्षांत आमची शक्ती वाढली. जेव्हा आपण युतीचं राजकारण करतो ,तेव्हा काही तडजोडी कराव्या लागतात. बारामतीमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी सोबत घ्यायची आणि त्यांना बारामती लढू नका म्हणायचे, हे कसं दिसेल. बारामती लढायची आमची इच्छा होती. पण अजित पवार यांना ती जागा आम्ही दिली. एक फरक आहे जिंकतील तर पवारच. पण सुनेत्राताई पवार जिंकल्या तर त्या मोदीजींना पाठिंबा देतील आणि सुप्रिया सुळे जिंकल्या तर त्या राहुल गांधींसोबत असतील. त्यामुळे लोक आमच्यासोबत म्हणजे मोदींजीसोबत येतील.
प्रश्न ः हे कसं घडविलं. हर्षवर्धन पाटील अजित पवारांसोबत कधी दिसतील, असं वाटलं नव्हतं. विजय शिवतारे यांनी मेळावा घेऊन विरोध केला. त्यांनाही शांत केलं. हे कसं घडलं?
फडणवीस ः एका वाक्यात सांगायचं तर ‘मोदी है तो मुमकीन है।’ मोदीजींच्या नावावर, कामावर आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी हे सर्व एकत्र आले आहेत. अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात संघर्ष झाला. त्याची मोठी किंमत त्यांनीच चुकवली. त्यामुळे त्यांच्या मनातील राग, संताप हा साहजिकच होता. विजय शिवतारे यांनाही किंमत चुकवावी लागली. पण शेवटी मी आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांची समजूत काढली. आपलं ध्येय मोदीजी आहेत. कालपर्यंत मोदीजींच्या विरोधात उभे असलेले अजित पवार जर मोदीजींना समर्थन देत असतील तर तुम्हीदेखील त्यांना मदत केली पाहिजे. आता ते ताकदीने अजित पवारांसोबत आहेत.
प्रश्न ः 2014 साली तरुण अभ्यासू आमदार मंत्री न झालेले देवेंद्र फडणवीस थेट मुख्यमंत्री झाले. त्यावेळी चर्चा अशी होती की, नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात अशी चौकशी केली की शरद पवार यांना विकलं जाणार नाही. त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाही, असा माणूस कोण? तेव्हा त्यावेळच्या संघटन मंत्र्यांनी असा माणूस एकच आहे की तो म्हणजे देवेंद्र फडणवीस असं सांगितले.
फडणवीस ः मला याची कल्पना नाही. मोदीजी नेत्यांना ट्रॅक करतात. 2010 पासून ते महाराष्ट्राचे राजकारण जवळून पाहत होते. त्यामुळे कोण काय करतंय याकडे त्यांचं निश्चित लक्ष होतं. पक्षातला नेता म्हणून मी नेमकं काय करतोय याचं ट्रॅकिंगही त्यांच्याकडे होतं. त्यामुळे निश्चितपणे त्यांनी तो निर्णय घेतला. त्यासाठी पवार यांच्याशी संघर्ष हा एकमेव मुद्दा होता की अजून काही मुद्दे होते, याची मला कल्पना नाही.
प्रश्न ः देवेंद्रजी माहीत असलं तरी तुम्ही तसं सांगणार नाही. काल अकलूजमध्ये एक वेगळं रूप दिसलं. एक वेगळा संताप. आक्रमकता असतेच पण तो जो संताप होता, माझ्या विरोधात कोण जातंय त्याचा ईश्वर सत्यानाश करतोय एवढं टोकाचं बोलताना पहिल्यांदाच ऐकले.
फडणवीस ः तेथे कडक भूमिका एवढ्यासाठी घेतली की, कार्यकर्त्यांनी मला सांगितलं की, आम्हाला धमकावले जाते. आम्हाला काम करू दिले जात नाही. आम्ही बैठकीला आलो तर आम्हाला फोन येतात. बैठकीला का गेलात. म्हणून मी सांगितलं. लोकशाही आहे तुम्ही मते मागा, आम्हीही मागतो. ज्याला मत द्यायचं त्याला जनता देईल. पण ठोकशाही कराल तर मी सहन करणार नाही. मी दबणार नाही आणि ठोकशाहीही सहन करणार नाही, हे मी ठणकावून सांगितलं.
प्रश्न ः विश्वासघाताचा मुद्दा अकलूजपुरता मर्यादित होता की, व्यापक होता?
फडणवीस ः मी सगळ्या विश्वासघातक्यांबद्दल बोललोय.
प्रश्न ः देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा पाच वर्षे मुख्यमंत्री पद पूर्ण केलेला व कोणताही आरोप नसलेला दुसरा कोणी नाही, असे नरेंद्र मोदी म्हणाले. दिनेश शर्मा यांनीही दिल्लीत नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र असे स्पष्ट केलं. मोदी हे सांगतात त्यावेळी मंचावर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले असतात. ही सल अनेकांकडून व्यक्त होत होती.
फडणवीस ः त्यात मला वावगं वाटत नाही. राजकारणात जो रोल मिळाला त्यामध्ये उत्तम काम केलं पाहिजे. पक्षाचा निर्णय महाराष्ट्राच्या हिताचा आहे. आम्ही सत्तेचे लालसी नाही. मात्र, आमच्यासोबत दगा झाला आहे. उद्धव ठाकरे यांना अडीच वर्षे मुख्यमंत्री पद द्यायचं ठरलं असतं, तर ते सहर्ष दिलं असतं. पण आमच्याशी बेईमानी करून, धोका करून, विश्वासघात करून आणि आमच्या पाठीत खंजीर खुपसून जर कोणी मुख्यमंत्री होण्याचा प्रयत्न करत असेल, तर आम्ही ते कसं सहन करणार?
प्रश्न ः शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटीच्या मुद्द्यावर महायुतीला संशयाच्या भोवर्‍यात उभं केलं जातंय?
फडणवीस ः याचा काही फरक पडणार नाही. महाराष्ट्रात खर्‍या अर्थानं सरकार पाडण्याची सुरुवात कोणी केली? वसंतदादा पाटील यांचं सरकार त्यांच्याच पक्षात राहून पाडण्याचं काम कोणी केलं? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळी त्यांचा पक्ष तोडून त्यांना दुःख देण्याचं काम कोणी केलं? हे सगळ्यांनाच स्पष्ट माहिती आहे. हे दोन पक्ष विभाजित झाले याचे एकमेव कारण अहंकार आणि अतिमहत्त्वाकांक्षा. उद्धव ठाकरे यांच्याकडे अहंकार तर होताच. आमच्यासोबत सत्ता भोगत असताना रोज मोदीजींवर शेलक्या शब्दात बोलायचं, लिहायचं हे त्यांनी केलं. कारण तो त्यांचा अहंकार होता. मुख्यमंत्री पदाची लालसा होती. खरंतर शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवायचं असतं, तर एकनाथ शिंदेंना बनवता आलं असतं. त्यांना शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवायचं नव्हतं, तर स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं होतं. संधी मिळाली तसं त्यांनी विचारांना तिलांजली दिली. शिवसेनाप्रमुखांचे विचार बासनात गुंडाळून सरकार स्थापन केले.
शरद पवार यांनी स्वतः तीनवेळा चर्चा करून अजित पवार यांना पुढे करून आमच्याशी युती करण्याचा निर्णय घेतला व मागे हटले आणि प्रत्येकवेळी अजित पवार यांना व्हिलन ठरविले. त्यांना तोंडघशी पाडलं. याचं एकमेव कारण पक्ष सुप्रिया सुळे यांच्या हातात द्यायचा होता. अडसर अजित पवार होते.
प्रश्न ः शरद पवार व उद्धव ठाकरे यांना संततीप्रेम नडले. एकाला कन्याप्रेम व एकाला पुत्रप्रेम.
फडणवीस ः शंभर टक्के. असे पक्ष कधी फुटतात का? कोणी ठरवून तरी फुटतात. सत्तेतून लोक विरोधी पक्षाकडे चाललेत असं कधी पाहिलंय का? कधी तरी यांनी आरसा पहावा.
प्रश्न ः हे स्क्रिप्ट भाजपचं होतं काय.
फडणवीस ः ही काही दूध पिणारी मुलं आहेत काय? एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले, त्यांच्या विरुद्ध एक पोलिस कम्प्लेंट दाखवा. एक ईडीची चौकशी दाखवा. त्यांच्याविरुद्ध तक्रारीचा कागदही नाही, तरीही ते आले. नगरविकास मंत्री होते. पण एखाद्याचं अस्तित्व संपविता, तेव्हा ती व्यक्ती शांत बसू शकत नाही.
प्रश्न ः तुम्ही आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून तयार करून दिल्लीला जाणार होता?
फडणवीस ः हिंदी सिनेमात सलीम जावेद यांच्या स्टोरीज लोकप्रिय असायच्या. त्यावेळचे सिनेमे सुपरहिट व्हायचे. आताचे हे नवीन सलीम जावेद आहेत. मात्र, ते सुपरफ्लॉप आहेत. हे पाच वर्षे ते का बोलले नाहीत. कधी अमित शहा तर कधी मी. ही अशी नावे घेऊन त्यांचा भांडाफोड झाला. आता शिवीगाळ करताहेत. ही भाषा त्यांना सोबत नाही. मात्र, ही निराशा आहे.
प्रश्न ः भाजप ईडी, आयटी, सीबीआय आणि आता निवडणूक आयोग याचा वापर करते, असा आरोप होतो.
फडणवीस ः आम्ही ईडी आणि ते वेडी का येडी. असं नाही. नव्या तंत्रामुळे आर्थिक गुन्हे, मनी लाँडरिंग उघडकीस येऊ लागले. आंतरराष्ट्रीय करार झाले. काळा पैसा जाहीर झाला पाहिजे. ईडीचा कायदा चिदम्बरम यांनी केला. आता मनी लाँडरिंग पकडणे सोपे झाले आहे. पूर्वी इन्कमटॅक्सला महत्त्व होतं. त्यापेक्षा जास्त महत्त्व आता ईडीला आले आहे. एक लाख कोटी रुपयांचा काळा पैसा मोदी यांच्यामुळे जप्त करता आला. काही पक्षांनी सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता असे मॉडेल तयार केले. ज्यांनी काळा पैसा जमा केला, त्यांना ईडी लागू होते. केवळ तीन टक्के लोकांचा राजकीय पक्षाशी संबंध आहे, अन्य 97 टक्के लोकांवर कारवाई झाली, त्यांचा राजकीय पक्षाशी संबंध नाही.
प्रश्न ः या निवडणुकीत औरंगजेब, अफझलखान खूप भावनिक मुद्दे आणले जातात. 2014 ला मोदी पर्व हे विकासाचं मॉडेल सुरू झाले. मात्र, अचानक धु्रवीकरणाचे राजकारण सुरू आहे.
फडणवीस ः औरंगजेब वगैरे मुद्दे हे उद्धव ठाकरे आणतात. आम्ही आणत नाही. त्यांचे ठरलेले 45 शब्द आहेत. त्यावर आधारित त्यांचे भाषण असते. आता ते हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो असे म्हणत नाहीत. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर माओ विचारांची छाप आहे. वारसाकर लावण्याचा उल्लेख आहे. आमची संपत्ती जप्त करून काँग्रेसवाले ती मुस्लिमांना वाटणार. मतांसाठी कोणत्या पातळीवर जातात, असे जाहीरनामे तयार करतात. मुस्लिम आरक्षण देऊन भारतीय राज्यघटना पायदळी तुडविण्याचे काम काँग्रेसवाले करणार आहेत.
प्रश्न ः मराठा आरक्षण हा कळीचा मुद्दा ठरला आहे.
फडणवीस ः कायदा स्थगित करण्याची मागणी न्यायालयात करण्यात आली. न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. हा कायदा प्रथमदर्शनी नाकारलेला नाही.

हेही वाचा : 

Back to top button