Lok Sabha Election 2024 | जिल्ह्यात तिशीच्या आतील मतदारावर रंगणार लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव | पुढारी

Lok Sabha Election 2024 | जिल्ह्यात तिशीच्या आतील मतदारावर रंगणार लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून, यंदा जिल्ह्यात ४७ लाख ४८ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मतदारांमध्ये नऊ लाख ४७ हजार ७३० मतदार हे तिशीच्या आतील आहेत. या पिढीवर निवडणुकांचे सारे चित्र अवलंबून असणार आहे.

लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामास प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी या दोन्ही मतदारसंघांमध्ये दि. २० मे रोजी मतदान पार पडणार आहे. या दोन्ही मतदारसंघांतून लढतीचे चित्र अद्यापही अस्पष्ट असले, तरी इच्छुकांनी आतापासूनच मतदारांच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली आहे. जिल्ह्यात २४ लाख ७४ हजार पुरुष मतदारांची नोंदणी झाली आहे. तसेच २२ लाख ७३ हजार महिला मतदार असून, ११० तृतीयपंथी मतदार आहेत. या मतदारांमध्ये तिशीच्या आतील नऊ लाख ४७ हजारांवर मतदार आहेत. एकूण मतदारांपैकी ६६ टक्के मतदारांचे वय हे ५० पर्यंत आहे. या सर्व मतदारांवर निवडणुकीचा निकाल अवलंबून असेल. त्यामुळे या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.

लिंग गुणोत्तराचे प्रमाण ९१९
लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्हा निवडणूक शाखेने राबविलेल्या विशेष मतदार नोंदणी मोहिमेला महिला मतदारांचा चांगला प्रतिसाद लाभला. त्यामुळे जिल्ह्यातील दर हजार पुरुष मतदारांमागील महिलांचा टक्का वाढला आहे. त्यानुसार मतदारयादीतील स्त्री-पुरुष गुणोत्तराचे प्रमाण ९१३ वरून ९१९ वर पोहोचले आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या गुणोत्तराचा विचार केल्यास, कळवण-सुरगाणा या आदिवासीबहुल विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक प्रमाण आहे. तेथे एक हजार पुरुषांमागे ९६५ इतक्या महिला मतदार आहेत, तर जिल्ह्यात नाशिक पश्चिम मतदारसंघात हे प्रमाण सर्वांत कमी असून, येथे हे प्रमाण केवळ ८५८ इतके आहे.

मतदारसंख्या
वयोगट                        मतदार                           टक्के

१८-१९                        ५९,३१४                            १.२५
२०-२९                        ८,८८,४१६                         १८.७५
३०-३९                        १०,९७,६५६                       २३.१२
४०-४९                        १०,९६,७७४                       २३.१
५०-५९                        ७,४१,३९२                          १५.६२
६०-६९                        ४,७७,९०५                         १०.०६
७०-७९                        २,५३,८६१                          ५.३५
८० प्लस                       १,३२,५३२                           २.७९
एकूण                           ४७,४७,७०५                        १००

हेही वाचा:

Back to top button