वर्षभरापासून किसान रेल्वे यार्डातच | पुढारी

वर्षभरापासून किसान रेल्वे यार्डातच

नाशिक : गौरव जोशी
केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करत सुरू केलेली किसान रेल्वे कृषी विभागाच्या दुर्लक्षामुळे वर्षभरापासून बंद पडली आहे. रेल्वेअभावी जिल्ह्यातून परराज्यात होणारी शेतमालाची जलद वाहतूक ठप्प झाली आहे. त्याचा फटका सर्वस्वी शेतकर्‍यांना सहन करावा लागत आहे.

देशातील शेतकर्‍यांना केंद्रस्थानी ठेवत केंद्र सरकारने किसान रेल्वे सुरू केली. देशातील पहिली किसान रेल्वे 7 ऑगस्ट 2020 ला नाशिकमधील देवळाली कॅम्प रेल्वे स्थानकातून धावली. जिल्ह्यातील शेतमाल जलद व सुरक्षितरीत्या परराज्यात पाठविण्यास पर्याय उपलब्ध झाल्याने त्याला शेतकर्‍यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आठवड्यात एकदा धावणारी रेल्वे नंतर पूर्ण आठवडाभर धावू लागली. त्यातून रेल्वेलाही चांगले उत्पन्न मिळत गेले. मात्र, आपला एक हजार ट्रिपचा टप्पा गाठणारी किसान रेल्वे वर्षभराहून अधिक काळापासून बंद पडली आहे. कृषी विभागाकडून सबसिडीचा अपेक्षित निधी मिळत नसल्याची रेल्वे मंत्रालयाची ओरड आहे. तसेच मध्यंतरीच्या काळात देशातील कोळसाटंचाईवेळी रेल्वे मंत्रालयाने अतिरिक्त मालगाड्या चालविल्याने किसान रेल्वे बंद करण्यात आली. परंतु, बंद पडलेल्या रेल्वेला पुन्हा गती देण्यासाठी कृषी विभागाने पावले उचलली नाही, तर रेल्वे मंत्रालयानेही स्वारस्य दाखविले नाही. या दोन्ही विभागांच्या उदासीनतेमुळे किसान रेल्वे यार्डातच उभी राहिली आहे. परिणामी शेतातील ताजा माल जलद व सुरक्षितरीत्या परराज्यात पाठवून अधिक नफा कमाविण्याचे शेतकर्‍यांचे स्वप्न धुळीस मिळाले आहे.

रेल्वेची मालवाहतूकसेवा
किसान रेल्वे बंद पडली असली, तरी रेल्वेची मालवाहतूकसेवा अखंड सुरू आहे. पण, या सेवेत अधिकचा आर्थिक भार तसेच वेळेत अपेक्षित ठिकाणी माल पोहोचण्याची हमी नसल्याने शेतकरी व व्यापार्‍यांपुढे संकट ठाकले आहे.

सोलापूर रेल्वेचे भवितव्य अधांतरी
देवळाली ते दाणापूर किसान रेल्वेला मिळालेला प्रतिसाद बघता सोलापूर येथून दुसरी रेल्वे सुरू करण्यात आली. मनमाड येथे देवळाली किसान रेल्वेला सोलापूरची रेल्वे जोडून पुढे मार्गस्थ केली जात होती. पण, देवळालीची रेल्वेसेवाच बंद पडल्याने सोलापूर रेल्वेचे भवितव्य अंधकारमय झाले आहे.

शेतमालाचे नुकसान
किसान रेल्वे कार्यान्वित असताना शेतकरी सकाळी शेतातून माल काढल्यानंतर सायंकाळी रेल्वेने तो परराज्यात धाडत होते. त्यामध्ये कांदा, द्राक्ष, डाळींब, फळे, भाजीपाल्यासह अन्य पिके व मासे यांची वाहतूक केली जायची. पण, किसान रेल्वे बंद पडल्याने वेळेत मालाची वाहतूक करणे बंद झाल्यामुळे शेतकर्‍यांना शेतमालाचे नुकसान सहन करावे लागत आहे.

Back to top button