नाशिक : बचत प्रमाणपत्र योजनेचा 371 महिलांना लाभ! | पुढारी

नाशिक : बचत प्रमाणपत्र योजनेचा 371 महिलांना लाभ!

दीपिका वाघ : पुढारी वृत्तसेवा
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात ‘महिला सन्मान बचतपत्र योजना’ जाहीर केली होती. या योजनेला महिलांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून, जिल्हा टपाल कार्यालयातून नाशिक शहरातील सुमारे 371 हून अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यापोटी टपाल खात्याकडे एकूण 5 कोटी 93 लाख रुपये इतकी रक्कम जमा झाली आहे.

एप्रिल महिन्यात शासकीय सुट्या अधिक असल्याने शिवाय योजनेबद्दल फारशी जनजागृती न झाल्याने अधिक महिलांपर्यंत ही योजना पोहोचू शकलेली नाही. 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2025 पर्यंत ही योजना सर्व वयोगटांतील महिला व मुलींकरिता लागू असणार आहे. ज्या महिलांना लिहिता वाचता येत नाही अशा महिलांना जिल्हा टपाल कार्यालयामधून फॉर्म भरून मिळत आहे आणि योजनेबद्दल माहिती समाजावून सांगितली जात आहे. महिला सन्मान बचतपत्र काढण्यासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड आणि फोटो कागदपत्र आवश्यक असणार आहे. योजना घेतल्यानंतर तीन महिन्यांनी रक्कम खात्यावर टाकता येणार आहे. एक वर्षानंतर आपत्कालीन परिस्थितीत 40 टक्के इतकी रक्कम काढता येणार आहे.

असा मिळणार परतावा…
सध्या पोस्टात एफडीचा व्याजदर एक वर्षासाठी 6.8 टक्के इतका आहे. परंतु महिला सन्मान बचतपत्र योजनेत 7.5 टक्के व्याजदरानुसार 2 लाख रुपये दोन वर्षांकरिता गुंतवणूक केल्यास 32 हजार 44 रुपये इतका परतावा मिळतो. 1 लाखाची गुंतवणूक केल्यास 16 हजार 22 रुपये इतक्या व्याजासह परतावा मिळतो तर 50 हजारांची गुंतवणूक केल्यास 8 हजार 11 रुपये व्याजासह परतावा मिळतो.

प्रवर अधीक्षक एम. एस. आहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विशेष सेवा हेल्प डेस्क सुरू केला आहे. योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून, अनेक महिलांपर्यंत योजनेबद्दल माहिती पोहोचली नाही. – डॉ. संदेश बैरागी, जनसंपर्क अधिकारी

महिला सन्मान बचतपत्राची वैशिष्ट्ये
बचतपत्र योजना 31 मार्च 2025 पर्यंत घेता येणार आहे, योजना दोन वर्षे राहणार आहे, रुपये 1 हजार ते 2 लाखांपर्यंत (त्यापेक्षा कमी किंवा जास्त नाही) रक्कम गुंतवणूक करता येणार आहे, एका महिलेच्या नावावर कमाल 2 लाखांपर्यंत कितीही बचतपत्र घेता येईल पण दोन खात्यांमध्ये किमान तीन महिन्यांचे अंतर असले पाहिजे, व्याज चक्रवाढ पद्धतीने असेल, एक वर्ष झाल्यानंतर खात्यातील 40 टक्के रक्कम एकदाच काढता येते,अपवादात्मक परिस्थितीशिवाय खाते मुदतपूर्व बंद करता येणार नाही.

आमचा चपला-बुटांचा व्यवसाय आहे. मला या योजनेबद्दल काहीही माहिती नव्हते. पोस्टात आल्यावर योजनेबद्दल कळले. मला लिहिता येत नसल्याने इथेच फॉर्म पण भरून मिळाला. – लता शिंदे, योजना लाभार्थी.

हेही वाचा:

Back to top button