पुढारी ऑनलाईन डेस्क : Ganguly vs Kohli : विराट कोहली आणि सौरव गांगुली यांच्यातील दीर्घकाळ चाललेल्या वादाला आता नवे वळण मिळाले आहे. अलीकडेच, जेव्हा दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगोलरच्या संघांमध्ये आयपीएल सामना झाला तेव्हा या दोन्ही खेळाडूंनी एकमेकांशी हस्तांदोलन केले नाही, त्यानंतर विराटने दादाला इन्स्टाग्रामवरून अनफॉलो केले. आता विराटच्या या निर्णयानंतर गांगुलीनेही त्याचा बदला घेतला आहे.
अनफॉलो झाल्यानंतर सौरव गांगुलीने आता धक्कादायक पाऊल उचलत त्याच्या इन्स्टाग्राम फॉलो लिस्टमधून विराटचे नाव काढून टाकले आहे. म्हणजेच या दोन दिग्गजांमध्ये सोशल मीडियावर सुरू असलेला गोंधळ थांबण्याचे नाव घेत नाही आहे. आता दोन्ही खेळाडूंनी सोशल मीडियावरूनही एकमेकांशी असलेले नाते पूर्णपणे संपवले आहे. गांगुली याआधी विराटला इन्स्टाग्रामवर फॉलो करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या, पण आता अनफॉलो झाल्यानंतर दादानेही विराटला जशास तसे उत्तर दिले आहे.
आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्यानंतर विराट कोहलीने सर्वांशी हस्तांदोलन केले. पण दिल्ली कॅपिटल्सचे क्रिकेट संचालक सौरव गांगुलीकडे दुर्लक्ष करून हस्तांदोलन करण्याचे टाळले. या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर पुन्हा एकदा गांगुली आणि विराटमधील 'कॅप्टन्सी' वादाची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे.
या सामन्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले ज्यात विराट कोहली सौरव गांगुलीकडे पाहत होता. विराट क्षेत्ररक्षण करत होता आणि सौरव गांगुली डगआउटमध्ये बसला होता. सामन्याच्या 18 व्या षटकात हे घडले जेव्हा आरसीबीला दिल्लीविरुद्ध विजयासाठी फक्त 1 विकेटची आवश्यकता होती. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये विराटने गांगुलीशी हस्तांदोलन केले नाही. पण या सगळ्यात या प्रकरणाला आता नवे वळण लागले आहे कारण कोहलीने चक्क गांगुलीला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याचे समोर आले आहे.
रिपोर्टनुसार, कोहली आधी दादांना फॉलो करायचा पण आता विराटने त्याला फॉलो करणे बंद केले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, कोहलीचे ही कृती सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. 2021 मध्ये कोहलीने टीम इंडियाचे टी-20 कर्णधारपद सोडले होते. त्याला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरूनही काढून टाकण्यात आले. यादरम्यान बराच वाद झाला आणि गांगुली-कोहलीचे संबंध बिघडल्याचे समोर आले. गांगुली त्या काळात बीसीसीआयच्या अध्यक्षपदी होता. कर्णधारपद सोडण्याबाबत बीसीसीआयने आपल्याशी कोणतीही चर्चा केली नसल्याचा आरोपही विराटने पत्रकार परिषदेत केला होता.