गलती से मिस्‍टेक! जाहीर सभेत कंगना हे काय बोलून गेल्‍या … | पुढारी

गलती से मिस्‍टेक! जाहीर सभेत कंगना हे काय बोलून गेल्‍या ...

पुढारी ऑनलाईन डेस्क : हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार आणि अभिनेत्री कंगना राणौत यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कंगना बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर टीका करताना चुकल्या आणि त्यांच्या जागी भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांचे नाव घेतले.

तेजस्वी यादव गेल्या महिन्यात सोशल मीडियावर मासे खातानाचा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर वादात सापडले होते. लोकसभा निवडणूक प्रचारासाठी गेलेले तेजस्वी यादव अचानक मच्छीमार मासेमारी करत असलेल्या तलावाजवळ गेले होते. त्यांच्यासोबत विश्‍व हिंदू परिषदेचे प्रमुख मुकेश साहनी आणि दरभंगाचे उमेदवार ललित यादवही होते. मच्छिमारांनी त्यांच्या जाळ्यात मासे पकडले होते. हा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर तेजस्वी यादव यांनी हेलिकॉप्टरमध्ये तळलेले मासे खातानाचा व्हिडिओ पोस्ट केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी नवरात्रीत  मासे खातानाचा पोस्ट केलेल्या तेजस्‍वी यादव यांच्यावर टीका केली होती.

कंगना राणौत यांचा नावावरून झाला घोळ

एका जाहीर सभेला संबोधित करताना कंगना रणौत तेजस्वी यादव यांच्यावर टीका करत होत्या. यादव यांनी शेअर केलेल्या मासे खातानाच्या व्हिडिओचा संदर्भ देत त्या टीका करत होत्या. मात्र तेजस्वी यादव यांच्या नावाऐवजी त्यांनी तेजस्वी सुर्या असे म्हटले. तेजस्वी सूर्या हे भाजपचे नेते आणि बेंगळुरू दक्षिणमधील खासदार आहेत. राणौत म्हणाल्या, “तो बिघडलेल्या राजपुत्रांचा पक्ष आहे. त्यांना कुठे जायचे हे त्यांनाच कळत नाही. चंद्रावर बटाटे पिकवणारे राहुल गांधी असोत किंवा तेजस्वी सूर्या, जो गुंडगिरी करतो आणि मासे खातो.”

यादवांनी उडवली खिल्ली

तेजस्वी यादव यांनी कंगना राणौत यांचा व्हायरल व्हिडिओ पोस्ट करून खिल्ली उडवली आहे. “कोण आहे ही बाई?” असे कॅप्शनमध्ये त्यांनी म्हटले आहे. त्यांनी भाषणाची व्हायरल क्लिप देखील पुन्हा पोस्ट केली आहे, जी नरुंदर नावाच्या वापरकर्त्याने त्याच्या एक्स खात्यावर पोस्ट केली होती.

‘त्या’ व्हिडिओवर तेजस्वी यादव यांचे स्पष्टीकरण

मासे खातानाच्या व्हिडिओवर संतप्त प्रतिक्रिया आल्याने तेजस्वी यादव यांनी नंतर स्पष्टीकरण दिले होते. ते म्हणाले की, नवरात्रोत्सव सुरू होण्यापूर्वी व्हिडिओ शूट करण्यात आला होता. नवरात्री सुरू होण्याच्या एक दिवस आधी म्हणजे ८ एप्रिलची त्यांची पोस्ट असल्याचे त्यांनी म्हटले होते. हा व्हिडिओ भाजपचा बुद्ध्यांक तपासण्यासाठी अपलोड करण्यात आला होता. आम्ही आमच्या विचाराने योग्य असल्याचे सिद्ध केले, असे त्यांनी म्हटले होते.

हेही वाचा : 

Back to top button