मी राष्‍ट्रवादी सोबतच राहणार, चर्चेत तथ्य नाही, अजित पवारांची स्पष्टोक्ती | पुढारी

मी राष्‍ट्रवादी सोबतच राहणार, चर्चेत तथ्य नाही, अजित पवारांची स्पष्टोक्ती

पुढारी ऑनलाईन डेस्क : माझ्याबद्दल ज्या काही नाराज असल्याच्या बातम्या जाणीवपूर्वक वेगवेगळ्या ठिकाणी चालविल्या जात आहेत. त्यामध्ये काहीही तथ्य नाही, असा खुलासा राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधान भवनात पत्रकार परिषदेत केला. सकाळपासून अजित पवार हे नॉट रिचेबल असल्‍याच्या बातम्‍या येत होत्‍या. त्‍यावर त्‍यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्‍पष्‍ट केल्‍यानं राजकीय तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला.

कारण नसताना माझ्याबद्दल गैरसमज पसरविले जात आहेत. माझ्या सहकाऱ्यांबद्दलही गैरसमज पसरविले जात आहेत. ४० आमदारांच्या सह्या घेतलेल्या नाहीत. मी राष्ट्रवादीतच राहणार आहे. भाजपसोबत जाण्याबाबतच्या चर्चा निराधार आहेत अस त्‍यांनी सांगितलं.

शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीची जडणघजडण झाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही काम करत आहे. राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवरून दुसरीकडे लक्ष वळविण्यासाठी अशा चर्चा घडवून आल्या जात आहेत.

देवगिरी बंगल्याच्या पाठीमागे कॅमेरे लावले जात आहेत, असा आरोप करून कोणत्याही चर्चेत तथ्य नाही. आता मी पत्रकारांना काय स्टँपवर लिहून देऊ का ?, असे ते यावेळी म्‍हणाले. अजित पवार मगहाविकास आघाडीच्या सभेत का बोलले नाहीत, याचीच चर्चा होत आहे. पत्रकारांचे माझ्यावर ऐवढे प्रेम का आहे. तेच समजत नाही.

आमच्या पक्षाचे वकिल पत्र दुसऱ्या पक्षाने घेऊ नये, असा टोला पवार यांनी ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांना लगावला.
माझ्या भूमिकेवर बोलण्याचा शिंदे गटाच्या नेत्यांना काय अधिकार आहे, अशीही विचारणा पवार यांनी यावेळी केली.

जोपर्यंत जीवात जीव आहे. तोपर्यंत राष्ट्रवादी पक्षाचे काम करत राहणार आहे. १९९९ पासून आम्ही एक कुटुंब म्हणून पक्षाचे काम करत आहे. परंतु भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा पक्षातील कुणी जबाबदार नेत्यांने केली का ? असा सवाल करून तुम्हीच चर्चा घडवून आणली. आणि तुम्हीच गणित मांडत आहात, असे पवार यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले.

अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा राज्यभरात सुरू आहे. अजित पवार भाजपसोबत युती करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची जागा घेण्याची शक्यता असल्याचे वृत्त आहे. भाजपसोबत जाण्यासाठी अजित पवार यांना राष्ट्रवादीच्या ५३ पैकी सुमारे ४० आमदारांनी पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादीच्या या आमदारांनी अजित पवार यांना संमतीच्या सह्या दिल्या आहेत. योग्य वेळ आल्यावर ही यादी राज्यपालांना सादर केली जाईल, असे वृत्त द न्यू इंडियन एक्स्प्रेसने राष्ट्रवादी पक्षातील सुत्रांच्या हवाल्याने दिले होते. यामुळे राज्यात खळबळ उडाली.

हेही वाचा : 

Back to top button