लम्पीच्या लसीचे आता पुण्यात होणार उत्पादन; राज्यातील पहिलाच प्रकल्प | पुढारी

लम्पीच्या लसीचे आता पुण्यात होणार उत्पादन; राज्यातील पहिलाच प्रकल्प

पुणे; पुढारी वृत्तसेवा : लम्पी स्कीनच्या उपचारासाठी प्रभावी असलेल्या लसीचे उत्पादन आता पुण्यातच सुरू होणार आहे. येत्या नोव्हेंबरपासून पुण्यातील पुशवैद्यकीय जैवपदार्थ निर्मित संस्थेकडून (आयव्हीबीपी) लम्पी प्रतिबंधक लसीचे उत्पादन केले जाणार आहे. पुण्यातील पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मित संस्थेने लम्पी लस तयार करण्याचे तंत्रज्ञान कराराद्वारे घेतले आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून 1 कोटी 18 लाख रुपये देण्यात आल्याचे सांगण्यात येते.

लम्पीच्या लसीचे उत्पादन करणारी महाराष्ट्रातील ही पहिलीच संस्था असणार आहे. आयव्हीबीपी संस्थेच्या कर्मचार्‍यांना लस तयार करण्यासंदर्भात नुकतेच प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच केंद्राकडे नुमना चाचणीसाठी परवानगी मागितली आहे. लवकरच त्याला मान्यता मिळणार असून त्यानंतर लम्पी बाधित जनावरांवर त्याचा वापर करण्यात येणार आहे.

याबाबत नोव्हेंबरपर्यंत लस निर्मितीसाठी केंद्राकडून परवानगी मिळण्याची शक्यता आहे. पशुसंवर्धन विभागाचे सहआयुक्त डॉ. संतोष पंचपोर म्हणाले, ’राज्याला आवश्यक असणार्या लसीचे दोन कोटी डोस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महत्वाचे म्हणजे इतर राज्यांना या लसीचा पुरवठा करता येऊ शकतो.’ शासकीय संस्थेमार्फत लस निर्मित करणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य असल्याचे डॉ. पंचपोर यांनी सांगितले.

शेजारील राज्यांनाही फायदा…
जनावरांना होणार्‍या लम्पी स्कीनच्या प्रतिबंधक लसीचे पुण्यात उत्पादन सुरू झाल्याने पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्राला फायदा होणार आहे. याशिवाय शेजारील काही राज्यांनाही लस उपलब्ध करून देण्यात येऊ शकते. त्यामुळे लम्पीच्या लसीसाठी होणारी धावाधाव कमी होण्यास मदत होणार आहे.

Back to top button